ऐन सणासुदीच्या तोंडावर निसर्गाची झालेली अवकृपा..कापणीला आलेल्या पिकावर गारपीट आणि अवकाळी पावसाने घातलेला घाला.. डोळ्यादेखत गहू, हरभरा, कांदा, ज्वारी पिकांचे झालेले नुकसान..या सर्वाची छाया यंदाच्या अक्षय्य तृतीया (आखाजी) सणावर पडली आहे. सणासुदीचे दिवस आले असताना हातात पैसा नसल्याने आणि नजीकच्या भविष्यात तो येण्याची शक्यता धूसर असल्याने शेतकरी चिंतेत आहे. ही चिंता पाहून दरवर्षी आखाजी सणासाठी माहेरची वाट धरणाऱ्या सासुरवाशीण लेकीनेही गरीब बापाला अजून खर्चात न टाकण्याचा विचार केल्याने नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड या तालुक्यांसह खान्देशात दरवर्षी आखाजीच्या पाश्र्वभूमीवर ऐकू येणारी गाणी यंदा कानावर पडणे दुरापास्त झाल्याचे दिसत आहे.
दिवाळीप्रमाणेच आखाजी या सणास अहिराणीभाषिक भागात महत्व आहे. सासर आणि माहेर या दोघांची जबाबदारी अंगावर पडलेल्या विवाहितांसाठी तर या सणाचे खास महत्व. कारण या सणानिमित्त त्यांना माहेरी येण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे या कालावधीत शाळांनाही सुटय़ा असल्याने लहान मुलेही आखाजीच्या आनंदात मग्न असतात. नवीन हंगामातील पिकलेल्या आंब्याचा रस खाण्यास आखाजीपासूनच सुरूवात केली जाते. सर्वप्रथंम रसाचा नैवेद्य देवांना दाखविण्यात आल्यावर घरोघरी खापरावरील पूरणपोळी (मांडे) आणि आंब्याचा रस असा जेवणाचा बेत असतो. यंदा मात्र सतत होणारी गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे आखाजीचा आनंद हिरावला आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात सासुरवाशिणीकडून म्हटली जाणारी ‘आखाजीची गाणी’ अद्यापही कुठे ऐकू येत नाही.
अहिराणीभाषिक भागात आखाजीची अनेक लोकगीते प्रसिध्द आहेत. झाडाला झोका बांधून ही गाणी म्हटली जातात. त्यात-
आथानी कैरी, तथानी कैरी, कैरी झोका खाये वं
खडक फुटना, कैरी तुटनी, झूळ झूळ पामी वहाय वं..
हे गाणे अधिक प्रसिध्द आहे.
आपल्याला माहेरी घेऊन जाण्यासाठी ‘मुराळी’ (माहेरहून येणारा पाहुणा) येणार या आशेने वाटेकडे आस लावून बसलेल्या सासुरवाशिणींच्या पदरी या वर्षी निराशाच पडण्याची शक्यता आहे. पिकाच्या उत्पन्नावर घरातील लग्न सोहळा, देणं-घेणं, मुलांचे शिक्षण, असा प्रपंचाचा सर्व आर्थिक डोलारा पेलण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसात अवकाळी व गारपीटीने जबरदस्त तडाखा दिला आहे. त्यामुळे हतबल झालेला बळीराजा सासरी गेलेल्या मुलीला यंदा आखाजीसाठी आणू शकत नसल्याचे सांगताना त्यांचा कंठ भरून आल्याशिवाय राहत नाही. मान्सून उशिराने आल्यामुळे लांबणीवर पडून हातातून गेलेला खरीप हंगाम आणि त्यानंतर गारपीट व वादळाने हिरावून घेतलेला रब्बी हंगाम, यामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. सोसायटी, बँकेचे कर्ज, हातउसनवारीचे व्यवहार, यामुळे त्याच्याभोवतीचे संकट अधिकच घोंघावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain mess up akshaya tritiya festival in nashik
First published on: 21-04-2015 at 07:44 IST