भगवामय झालेला परिसर व सभागृह..पुन्हा एकदा त्वेषाने घुमलेला शिवसैनिकांचा ‘आवाज’.. शिवसेनाप्रमुखांविषयीच्या भावनांना वाट मोकळ्या करून देणाऱ्या कविता..साहेबांचे जीवनपट उलगडून दाखविणारा माहितीपट पाहताना हुंदके देणारे सभागृह..उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद..आणि वज्रमूठ आवळून आपल्या या नेत्यास एकदिलाने साथ देण्याचे शिवसैनिकांनी दिलेले वचन..
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर बुधवारी प्रथमच नाशिकला आलेले शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांची भेट खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी ठरली. शिवसेनेच्या या विभागीय मेळाव्यात उभयंतांच्या विविध छटा पहावयास मिळाल्या. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाचे दु:ख विसरले जाणार नाही. परंतु, अशा कटू प्रसंगात आपल्या कुटुंबातील सग्या-सोयऱ्यांना भेटून ते दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या उद्धव यांच्या भावना सर्वाच्या हृदयाचा ठाव घेणारे ठरल्या. विधानसभेवर भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे अभिवचन देत उत्तर महाराष्ट्रातील हजारो शिवसैनिकांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे त्यांना प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याविषयी शिवसैनिकांसह इतर राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. महाकवी कालिदास कलामंदिर व आसपासचा परिसर भगव्या झेंडांनी उजळून निघाला होता. भल्या सकाळपासून उत्तर महाराष्ट्रातून दाखल झालेल्या शिवसैनिकांच्या ताफ्यामुळे सभागृह ओसंडून वहात होते. गर्दीतून देण्यात येणाऱ्या घोषणा टिपेला पोहोचल्या होत्या. उध्दव यांना भेटण्याची आस प्रत्येकामध्ये दिसून येत होती. त्यांचे आगमन होण्यास उशीर होत असल्याने काही जणांनी शिवसेनाप्रमुख व शिवसेनेविषयीच्या कविता मांडल्या. त्यानंतर माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून बाळासाहेबांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील काही प्रसंग पाहताना शिवसैनिकांसह महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू रोखणे अवघड गेले. नियोजित वेळेपेक्षा तीन तासांच्या विलंबाने कार्याध्यक्षांचे सभागृहात आगमन झाले. तथापि, शिवसैनिकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. उलट, उध्दव यांचे आगमन होताच संपूर्ण सभागृहाने उभे राहत, घोषणा देत आपल्या नेत्यास अभिवादन केले. मोबाईलमध्ये त्यांची छबी टिपण्यासाठी एकच धडपड सुरू झाली. सळसळते सभागृह पाहून उद्धव ठाकरेही भारावून गेले. ‘कोण म्हणतं बाळासाहेब गेले, तुम्हा सर्वामध्ये मला बाळासाहेब दिसतात..’ असे सांगत शिवसेनाप्रमुख आपल्यातच असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. शिवसैनिक आपले कुटुंब आहे.
या कुटुंबासमोर नतमस्तक होण्यासाठी आपण आलो आहोत, असे त्यांनी नमूद केले. बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीविषयी अनेकांकडून विचारणा होत असली तरी शिवसैनिक आपले खरे ‘टॉनिक’ असल्याचा उद्धव यांनी आवर्जुन उल्लेख केला.
तत्पुर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी प्रास्ताविकात शिवसैनिकांना ‘आता रडायचं नाही तर लढायचं’ असे आवाहन केले. कार्याध्यक्षांनी आपल्या कृतीद्वारे शिवसैनिकांना एक धडा घालून दिला आहे. त्यांनी शिवसेनेतील प्रमुख पदाची अभिलाषा न ठेवता पक्षकार्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आगामी काळात आपणही पदाची आशा न बाळगता काम करण्यास तयार राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता कार्याध्यक्षांना साथ देण्याचा विश्वास द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. लिलाधर डाके यांनीही शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना विचार दिला, जगायचे कसे हे शिकविले, लढण्याचे बळ दिले, त्याच विचारांच्या आधारे विचलित न होता आपल्याला मार्गक्रमण करावयाचे असल्याचे नमूद केले. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहील यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले.
नीलम गोऱ्हे यांसह उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानंतर सर्वानी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे वचन दिले. यावेळी उध्दव ठाकरे यांना तलवार तसेच आसूड भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमानंतरही उद्धव यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड उडाली होती. या गर्दीला नमस्कार करत कार्याध्यक्ष आपल्या मोटारीत जाऊन बसले. यावेळी सुरक्षायंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
अनावर भावना..आवाहन..अन् पुन्हा तोच ‘आवाज’
भगवामय झालेला परिसर व सभागृह..पुन्हा एकदा त्वेषाने घुमलेला शिवसैनिकांचा ‘आवाज’.. शिवसेनाप्रमुखांविषयीच्या भावनांना वाट मोकळ्या करून देणाऱ्या कविता..साहेबांचे जीवनपट उलगडून दाखविणारा माहितीपट पाहताना हुंदके देणारे सभागृह..उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद..आणि वज्रमूठ आवळून आपल्या या नेत्यास एकदिलाने साथ देण्याचे शिवसैनिकांनी दिलेले वचन..

First published on: 06-12-2012 at 02:54 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unstopeble feelings challenges and afterwards once again same voice