महापालिका सफाई कामगारांना श्रम साफल्य योजनेंतर्गत मालकी हक्काने घरे मिळावीत, साफसफाई ठेकेदारी पद्धत बंद करावी, लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून सफाई कामगारांना पदोन्नती द्यावी, यांसह इतर अनेक मागण्या मेघवाळ वाल्मीकी समाजाच्या वतीने येथील महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निश्चित रक्कम देण्याची पद्धत रद्द करावी, सफाई कामगारांची भरती करण्यात यावी, घर कर्ज मर्यादा वाढवून १० लाख रुपये व वाहन कर्ज एक लाख रुपये मिळावे, क्लीनअपसारख्या संस्थेमार्फत सुरू असलेली ठेकेदारी रद्द करावी, सफाई कामगारांना साफसफाईचे साहित्य मिळावे, वैद्यकीय सुविधा द्याव्यात, कामगारांची संख्या वाढवावी, कामगारांना रामदेवपीर व गोकुळाष्टमीची सुटी जाहीर करावी, गोकुळाष्टमीसाठी आगाऊ सात हजार रुपये द्यावेत, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मेघवाळ वाल्मीकी समाजातर्फे आंदोलनही करण्यात आले होते, परंतु प्रशासनाने आंदोलन स्थगित करण्याची विनंती करून मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सहा-सात महिन्यांचा कालावधी गेल्यानंतरही कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे समाजाच्या प्रतिनिधींनी आयुक्तांना निवेदन देऊन मागण्यांविषयी चर्चा केली.
या वेळी आयुक्तांनी कामगारांचे प्रश्न व मागण्या त्वरित मंजूर करण्याचे आश्वासन दिले. कामगारांच्या मागण्या मंजूर न झाल्यास मेघवाळ वाल्मीकी समाजाच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
या प्रसंगी समाजाचे नेते सुरेश मारू, ताराचंद पवार, प्रवीण मारू, महेश ढकोलिया, रमेश मकवाणा, प्रमोद मारू, रणजीत कल्याणी, जयसिंग मकवाणा आदी उपस्थित होते.