विदर्भात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेली दडी.. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात झालेले नुकसान.. महागाईने वर काढलेले तोंड.. या कचाटय़ात सापडलेल्या सामान्यांना यंदाचा श्रावण महिना फारसा आनंदाचा न जाण्याचीच चिन्हे आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी संकटात आहे. गेल्या काही दिवसात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे बहुतेक सर्व भाज्यांचे भाव दुपटीने वाढले असून अशीच परिस्थिती राहिली तर भाज्यांचे भाव यंदाच्या श्रावणमासात गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या दीड महिन्यापासून नागपूर जिल्ह्य़ासह विदर्भात विविध भागात पाऊस नसल्यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात शेतीमध्ये करण्यात आलेली पेरणी वाया गेली आहे. बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली. भाज्या उत्पादकांना फायदा होत असला तरी सामान्य नागरिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसतो आहे. २७ जुलैला श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून या सणासुदीच्या दिवसात भाज्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी वर्तविली आहे. चार दिवसांपूर्वी पावसाने सलामी दिली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तो गायब झाला आहे. मान्सून सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिना पाऊस नसल्यामुळे फळ व पालेभाज्यांची आवक घटली आहे. एरव्ही पावसाळ्यात भाजीपाला महाग होतो, मात्र यंदा पाऊस नसल्यामुळे काही भाज्यांनी तर कळसच गाठला आहे. जेवणाचा आस्वाद वाढवणारी कोथिंबीर १३०, आले ७०, लसूण ११० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्रीला असून भाज्या ६०  ते १०० रुपये किलो भावाने विक्रीला आहे. टमाटे ५०  रुपये किलोप्रमाणे विक्रीला आहेत.
महागाईमुळे अनेकांच्या घरातील बजेट बिघडले आहे. नागपुरात येणारा भाजीपाला नागपूर जिल्ह्य़ातील आसपासच्या गावातून येतो. आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतूनही मोठय़ा प्रमाणात येत असतो. टोमॅटो, फुल कोबी, कोथिंबीर, मेथी, मिरची या रोजच्या जेवणात हमखास आढळणाऱ्या भाज्यांचे भाव अधिकच वाढले आहे. परिणामी गृहिणींपुढे भाज्यांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून येणाऱ्या श्रावण महिन्यात अशीच परिस्थिती राहिली तर सणासुदीच्या दिवसात मोठी अडचण निर्माण होणार आहे.
श्रावणात साधारणत: शाकाहार वाढतो, साहजिकच या महिन्यात भाज्यांची मागणी मोठी असते. आवक आणि मागणी या प्रमाणामुळे भाज्यांचे दरही उतरलेले असतात. मात्र, यंदाची परिस्थिती त्याला अपवाद आहे. भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवर, सिमला मिरची, पालक, गाजर, पोपट आणि कोबी यांच्या दरातही १५ ते २० टक्के वाढ झाली असल्याचे कॉटन मार्केटमधील भाजी विक्रेता संघाचे सदस्य राजाभाऊ पत्राळे यांनी कबूल केले. काही भाज्यांच्या दरात वाढ झाली असली तरी आवक कमी झालेली नाही. मात्र पावसाने अशाच प्रकारे दांडी मारली तर मात्र नंतर काही खरे नाही, असे पत्राळे यांनी सांगितले.  काही जिल्ह्य़ांमध्ये भाज्यांचे भाव अजून आवाक्यात आहेत, पण ही दरवाढ आणखी होण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.
या दरवाढीचा फटका ग्राहकांबरोबरच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक वस्तूंचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. अजूनही काही दिवस असाच पाऊस आला नाही तर भाज्यांचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया कॉटेन मार्केटमधील बाजारातील भाजी विक्रेत्यानी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरकोळ बाजारातील दर
टोमॅटो ५० रुपये किलो, पालक ५०, भेंडी ६०, चवळी ५० ते ६०, सिमला मिरची ६० ते ८० , कारले ६०, काकडी ३० , ढेमस  ५०, गाजर ४०, तोंडले ४०, कोहळे ३०, मेथी ५० ते ६०, आले १२० , लसूण ८०, मुळा ३० ते ४०, चवळीच्या शेंगा ६०, पत्ताकोबी ४०, सुरई ५०, भेंडी ६०, परवळ ५०,ते ६०, वांगे ६०, तोंडले ४०, मुळा ४०, बीट ६०,  तुरई ६० रुपये, लवकी ४०, दुधीभोपळा ४० रुपये.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable prices touching sky high due to shortage in supply
First published on: 19-07-2014 at 05:14 IST