प्रेयसीला खूश करण्यासाठी गाडय़ा चोरणाऱ्याला गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. वैभव आनंदा जाधव (वय २३, राजीव गांधीनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ८ चारचाकी व दोन दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली असून त्याची किंमत ५ लाख २७ हजार रुपये इतकी आहे.     
वैभव जाधव याचे कागलमधील एका युवतीशी प्रेम जडले होते. प्रेयसीला खूश करण्यासाठी तो नेहमी चारचाकी वाहनातून फिरायचा. मात्र ही वाहने त्याने वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेली असायची.
गाडी चोरायची त्यातून प्रेयसीला फिरवून आणायचे आणि नंतर पेट्रोल संपल्यावर ती तेथेच सोडून द्यायची, अशी त्याची पद्धत होती. या प्रकारे वैभव जाधव याने आतापर्यंत ८ चारचाकी वाहने चोरली होती. वैशिष्टय़ म्हणजे यातील बहुतांशी वाहने मारुती कंपनीची होती. तर चोरलेल्या दोन दुचाकी अॅक्टिवा कंपनीच्या होत्या. वाहनांच्या चोरीच्या तक्रारी वाढू लागल्यावर पोलिसांनी सतर्कतेने तपास सुरू ठेवला होता. आज गुरुवारी वैभव जाधव हा संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने वरीलप्रमाणे वाहने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आले आहे. अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांनी पत्रकारांना दिली.