सौर ऊर्जेतील नव्या शक्यता आणि संशोधनांचा आढावा घेणारे एकदिवसीय चर्चासत्र शनिवारी येथील विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात पार पडले. राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. पी. एस. खोडके, उपमहापौर मिलिंद पाटणकर, आयआयटी- मुंबईतील डॉ. अनुराधा गणेश, आयसीटीचे प्रा. भागवत, प्रा. भोकरे, प्राचार्य डी. के. नायक, डॉ. उषा राघवन आदींनी या चर्चासत्रात भाग घेतला. चर्चासत्रातील व्याख्यानांवर आधारित स्मरणिकाही या वेळी प्रकाशित करण्यात आली. तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी अशा प्रकारची चर्चासत्रे उपयुक्त ठरतात. त्यातून नव्या विचारांना व्यासपीठ मिळते. त्यादृष्टीने विद्या प्रसारक मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आहे, अशा शब्दांत खोडके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सौर ऊर्जेतील नवीन संशोधन, जलसिंचन आणि नॅनो तंत्रज्ञानातील सहभाग आदींचा आढावा या चर्चासत्रात घेण्यात आला.