शेतावरील कर्जाची नोंद रद्द करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या नाशिक तालुक्यातील विहीतगाव येथील तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. विहीतगाव शिवारात तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती आहे. तक्रारदाराच्या वडिलांनी २००४ मध्ये शेतात ग्रीन हाऊस तयार करण्यासाठी नाशिकच्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स शाखेतून १९ लाख ७० हजार रूपये कर्ज घेतले होते.
या कर्जाची तक्रारदाराने सात डिसेंबर १२ रोजी परतफेड केल्याने बँकेने तलाठीच्या नावे कर्जफेड केल्याबाबतचे पत्र दिले होते. या पत्रावरून शेतावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी तलाठी संतोष शिवाजी फोकणे याने तक्रारदाराकडे एक हजार रूपये मागितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर रचलेल्या सापळ्यात तलाठी अडकला.
बुधवारी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान तलाठी कार्यालयात पैसे स्वीकारताना त्यास अटक करण्यात आली.