ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़दिग्दर्शक लेखिका ‘विजया मेहता आणि आपण’ महोत्सव येत्या १३, १४ व १५ डिसेंबर रोजी सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात स्वत: विजया मेहता यांचा सहभाग राहणार असून यात विविध भरगच्च कार्यक्रम सादर होणार असून ही सोलापूरच्या नाटय़रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
हिराचंद नेमचंद वाचनालय, सृजन फिल्म सोसायटी व आराधना नाटय़संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या महोत्सवाचे उद््घाटन १३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता प्रा. निशिकांत ठकार यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. पी. के.जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात विजया मेहतांच्या नाटय़जीवन प्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार असून उद्घाटन सत्रानंतर लगेचच विजयाबाईंच्या नाटय़ व चित्रपट दिग्दर्शनाचा प्रवास माहितीपटाद्वारे उलगडून दाखविला जाणार आहे. त्यानंतर पंडित नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रांवर आधारित ‘लेटर्स टू माय डॉटर’चे नाटय़रुपांतर व स्मृतिचित्रे असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. तर दि. १४ रोजी सायंकाळी सहा वाजता ‘शाकुंतल’ संस्कृत नाटय़प्रयोग सादर झाल्यानंतर लगेचच ‘वाडा चिरेबंदी’ ही हिंदी नाटक दृश्यफीत व ‘हमीदाबाईची कोठी’ आणि ‘थिएटर पर्सन’ हे लघुपट दाखविले जाणार आहेत.
दि. १५रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी सायंकाळी पाच वाजता विजया मेहता या स्वत:, नाटय़संचाबरोबर काम करण्याची आपली पद्धत आणि विविध छंदांविषयी संवाद साधणार आहेत. महोत्सवातील या सर्वोच्च उंचीच्या कार्यक्रमासाठी पाचशे रुपये देणगीमूल्य असल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले. या ‘मास्टर क्लास’ कार्यक्रमात विजया मेहता यांच्यासह अभिनेत्री नीना कुलकर्णी, निर्माते अजित भुरे आदींचा सहभाग राहणार आहे. या पत्रकार परिषदेस सुनील गुरव, अमोल चाफळकर, विनय नारकर, अमीर तडवळकर आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
सोलापुरात उद्यापासून तीन दिवस ‘विजयाबाई आणि आपण’ महोत्सव
ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़दिग्दर्शक लेखिका ‘विजया मेहता आणि आपण’ महोत्सव येत्या १३, १४ व १५ डिसेंबर रोजी सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात स्वत: विजया मेहता यांचा सहभाग राहणार असून यात विविध भरगच्च कार्यक्रम सादर होणार असून ही सोलापूरच्या नाटय़रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
First published on: 11-12-2012 at 08:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijayabai ani apan festival from tomorrow in solapur