उरणमधील नागांव किनारपट्टीलगत असलेल्या ८०० मीटर लांबीच्या परिसरात समुद्राच्या महाकाय लाटांमुळे किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्राचे पाणी गावात घुसू लागले आहे. यामुळे किनारा उद्ध्वस्त झाला असून किनाऱ्यावरील नारळ आणि इतर झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांसाठी असलेल्या गोडय़ा पाण्याच्या  विहिरींनाही धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्याची मागणी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे वारंवार मागणी करूनही बोर्ड दुर्लक्ष करीत असल्याने नागांव ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. उरण शहरालगत एक ते दीड किलोमीटर लांबीचा नागांव व पिरवाडी समुद्रकिनारा आहे. या किनारपट्टीवर जवळजवळ २८०० लोकवस्ती आहे. या परिसराला सुमारे ८०० मीटर लांबीचा समुद्रकिनारा असून या भागात भात शेती, फळे, भाज्या तसेच नारळी, पोफळीच्या झाडांपासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे. काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या वाढत्या ताकदीमुळे भरतीचे पाणी सीमारेषा ओलांडून येत किनारपट्टी उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतची नारळी- पोफळीची झाडे उन्मळून पडू लागली आहेत. या किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी २०११ पासून ग्रामस्थ मेरीटाइम बोर्डाकडे पत्रव्यवहार करून करीत आहेत. मात्र महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने नागांव ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्षच केल्याने ग्रामस्थांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयासमोरच आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे पंचायत समितीच्या सदस्या माया पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village lives in fear of the sea water intrusion
First published on: 21-03-2014 at 01:52 IST