वाडा तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून यात युतीने स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा सपशेल धुव्वा उडविला. युतीने १७ जागांपैकी १२ जागांवर विजय मिळविला आहे. उर्वरित जागांवर बहुजन विकास आघाडीचे तीन जण विजयी झाले, तर एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला केवळ एक जागा जिंकता आली आहे.
सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. परंतु, आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने त्यांना दारूण पराभवास सामोरे जावे लागले आहे. वाडा शहरात राहत असूनही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनिष गणारे प्रचारासाठी बाहेर पडले नाहीत. त्यांनी आपल्या प्रभागात मतदानाचा हक्कही बजावला नाही. तसेच राष्ट्रवादीचे नेते योगेश पाटील यांच्या प्रभागात राष्ट्रवादीला एकही जागा मिळविता आली नाही. विद्यमान सरपंच, उप-सरपंच यांच्या प्रभागातही राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला. वाडा पंचायत समितीचे उपसभापती आणि राष्ट्रवादीचे मंगेश पाटील यांच्या विभागातही श्रीकांत भोईर यांचा विजय झाला. चांबळे येथे मनसेने बाजी मारली.