गेल्या चार वषार्ंपासून सेवा देत असलेल्या डॉक्टरची बदली झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उपकेंद्रालाच कुलूप ठोकले होते. परंतु बदली झालेल्या डॉक्टरनेच आठवडय़ातून तीन दिवस सेवा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला ठोकलेले कुलूप उघडल्याचा प्रकार कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ‘मासोद’ या गावात घडला. डॉक्टरच्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.
मासोद या गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून आयुर्वेदिक रुग्णालयसुद्धा आहे. या आयुर्वेद रुग्णालयात डॉ. तिवारी गेल्या चार वर्षांंपासून सेवा देत होते. त्यांच्या सेवेमुळे गावकरी आनंदी होते. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. झाडे आणि डॉ. बहादुरे हे दोन डॉक्टर्स काम करत होते. डॉ. झाडे यांची
ऑगस्ट २०१४ मध्ये बदली झाली. त्यामुळे डॉ. बहादुरे यांना एकटय़ालाच कोंढाळी प्राथमिक आरोग्य
केंद्राचे कामकाज सांभाळावे लागायचे. चोवीस तास एकाच डॉक्टरला कामकाज सांभाळणे कठीण असते. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेकडे आणखी एका डॉक्टरची अपेक्षा व्यक्त केली.
ही अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मासोद आयुर्वेदिक प्राथमिक आरोग्य रुग्णालयात असलेल्या डॉ. तिवारी यांची १७ सप्टेंबरला कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली केली. त्यामुळे डॉ. तिवारी यांचे मासोद येथे जाणे बंद झाले. डॉ. तिवारी यांच्या ऐवजी दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती न केल्याने गावकरी नाराज झाले. तेथील सरपंच, उपसरपंचांनी मासोद येथे डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडे केली. परंतु या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे गावकरी आणखी चिडले. त्यातच गेल्या एक महिन्यापासून गावात संसर्गजन्य आजार आणि हिवतापाचे रुग्ण घरोघरी दिसून येऊ लागले. या रुग्णांना उपचारासाठी काटोल,
कोंढाळी किंवा नागपूरला धाव घ्यावी लागत असे. त्यामुळे आर्थिक अडचणीही वाढू लागल्याने गावकऱ्यांच्या संतापात आणखी भर पडू लागली.
या अडचणीवरील उपाय म्हणून गावकऱ्यांनी आयुर्वेदिक रुग्णालयाला कुलूप ठोकणे हाच पर्याय शोधला. २८ ऑक्टोबरला गावकऱ्यांनी आयुर्वेदिक रुग्णालयाला कुलूप ठोकले. जोर्पयंत बदली केलेल्या डॉ. तिवारी यांना पाठवत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा निर्धार गावकऱ्यांनी केला. ही माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांना कळली. त्यांनी यावर त्वरित मार्ग काढण्याचे ठरवले. कारण कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असणे आवश्यक आहे. तेथे सध्या कुणाचीही नियुक्ती करणे अशक्य आहे, तसेच लोकांच्या आग्रहास्तव मासोदलाही डॉक्टर असणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. त्यानुसार डॉ. तिवारी यांनी तीन दिवस मासोद येथे उपचार करावे, असे ठरवण्यात आले. त्यानुसार डॉ. तिवारी गुरुवारी मासोद येथे आले. त्यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोंढाळी येथे राहणे कसे गरजेचे आहे, हे स्पष्टपणे गावकऱ्यांना सांगितले. असे असले तरी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस मासोदच्या रुग्णालयात येऊन सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत करून दोन दिवसांपूर्वी आयुर्वेद रुग्णालयाला लावलेले कुलूप नागरिकांनी उघडले. डॉ. तिवारी हे तीन दिवस
मासोद येथे उपस्थित राहणार असल्याने कोंढाळी येथे असलेल्या
डॉ. बहादुरे यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन डॉक्टरची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers open lock of health center
First published on: 01-11-2014 at 09:36 IST