येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘जागर जाणिवांचा’ उपक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून आज विद्यार्थीनी सुरक्षा संघाच्या अंतर्गत ‘वीरांगना’ पथकाची स्थापना करण्यात आली.   
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करणे, मुलींचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविणे, मुलींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे यासाठी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. आज पोलीस निरीक्षक मधुकरराव औटे यांनी केलेल्या मार्गदर्शनास अनुसरून पोलीस अधिकारी प्रिया थोरात यांच्या उपस्थितीत वीरांगना पथकाची स्थापना झाली. त्या म्हणाल्या की, समाजात अनिष्ट प्रवृत्ती बळावल्या आहेत. त्यांचा प्रकर्षांने मुकाबला करण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजातील व कुटुंबातील व्यक्तींना व्यसनांपासून प्रवृत्त करावे, ठोशास ठोसा याप्रमाणे मुलींनी प्रत्युत्तर द्यावे, असेही त्यांनी सूचित केले. संरक्षण दलात मुलींना समाविष्ट होण्याची संधी आहे. त्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. एस. डी. पिंगळे  अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. पी. जी. जोशी यांनी केले, तर प्रा. मनीषा बारबिंड यांनी परिचय करून दिला. समन्वयक प्रा. संजय अरगडे, प्रा. रवींद्र जाधव व प्रा. शैलेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुरेखा भिंगारदिवे यांनी आभार मानले.