माहूर येथील श्री विष्णू कवी मठातर्फे देण्यात येणाऱ्या महाकवी संत विष्णुदास राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह नऊजणांचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
माहूरच्या विष्णू कवी मठातर्फे विविध क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यंदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अ‍ॅड. शिवाजी जाधव, भास्कर निर्मल पाटील, देवीदास कुलकर्णी, आनंद देशपांडे, स्टार माझा वाहिनीचे योगेश लाटकर, डॉ. भाग्यलक्ष्मी अष्टपुत्रे, कृष्णा पांडे, महिला विकासासाठी कार्यरत असलेल्या सिंधुताई तिडके यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. मठाचे विश्वस्त अ‍ॅड. विजयकुमार भोपी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार समितीतील ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे, साहित्यिक देविदास फुलारी व मसापचे कार्यवाह कानडखेडकर यांची उपस्थिती होती. शनिवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.