तिघांची दांडी, सेनेने उमेदवार बदलला
नियोजन समिती निवडणूक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतून निवडून द्यायच्या जागांबाबत निर्माण झालेले पक्षीय अविश्वासाचे वातावरण, शिवसेनेने ऐनवेळी फिरवलेला उमेदवार व राष्ट्रवादीचे दोन तर भाजपचा एका अशा तीन जणांनी मतदान न केल्याने या अविश्वासाच्या वातावरणात मिळालेली फोडणी, यामुळे उद्या (मंगळवारी) होणाऱ्या मतमोजणीतून कोणते निकाल बाहेर पडणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान जि.प. सदस्यांतून निवडून द्यायच्या ९ जागांसाठी ७५ पैकी ७२ जणांनी मतदान (९६ टक्के) केले तर शिर्डी परिषदेतून निवडून द्यायच्या एका जागेसाठी १७ पैकी १४ जणांनी मतदान (८३ टक्के) केले. शिर्डीचे अभय शेळके, निलेश कोते व साधना लुटे यांनी मतदान केले नाही. जि. प. सदस्यांपैकी स्वत: उमेदवार असलेले राजेंद्र फाळके व बाजीराव दराडे (दोघेही राष्ट्रवादी) तसेच अंजली काकडे (भाजप) या तिघांनी मतदान केले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रियदर्शनी सभागृहात सायंकाळी ५ पर्यंत मतदान झाले, उद्या त्याच ठिकाणी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होईल. मतदान प्राधान्यक्रमानुसार होते.
बिनविरोध होणारी निवडणूक शिवसेनेच्या बाबासाहेब तांबे की दत्तात्रेय सदाफुले यांच्यातील वादामुळे घ्यावी लागली. राष्ट्रवादीच्या जि. प.तील सत्तेला भाजप-सेना युतीचा पाठिंबा आहे. संख्याबळानुसार भाजप-सेनेला प्रत्येकी २ जागा मिळणार होत्या परंतु आग्रहाने त्यांनी राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक जागा वाढवून घेतली.
नऊ जागांसाठी राष्ट्रवादीचे ४, काँग्रेसचे ३, सेनेचे २ व भाजपचा १ उमेदवार रिंगणात आहेत. सेनेने पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार आधी सदाफुले यांच्याऐवजी बाबासाहेब तांबे यांची उमेदवारी निश्चित केली होती. तांबे यांच्या नावास पारनेरचे आमदार विजय औटी यांचा विरोध होता. त्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने सेनेने उमेदवारी फिरवली व दोन दिवसांपुर्वी सदाफुले यांची उमेदवारी अधिकृत ठरवून त्यांचेच नाव राष्ट्रवादीला कळवले गेले. याची कुणकुण तांबे यांना लागल्याने त्यांनी आधीच स्वतंत्रपणे राष्ट्रवादीशी संधान बांधले होते. त्याचा परिणाम मतदानात दिसणार का याचे औत्सुक्य आहे.
जि. प.च्या प्रत्येक सदस्यास एकुण ९ मते देणे शक्य होते. परंतु कोणत्या सदस्याने कोणत्या उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार मतदान करायचे याचा पसंतीक्रम प्रत्येक पक्षाने ठरवून दिला होता. त्यानुसार भाजप-सेनेने प्रत्येकी ६ मते पसंतीक्रमानुसार द्यायची होती. परंतु प्रत्यक्ष मतदानात दोन्ही पक्षाचे सदस्य केवळ दोनच मते देत होते. ही बाब राष्ट्रवादीच्याच एका पदाधिकाऱ्याने सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या लक्षात आणून देत अविश्वास दाखवत असल्याचा आरोप केला. चौकशी करता भाजपच्या एका सदस्याने त्यास दुजोरा दिला. राष्ट्रवादीचे दोन मतदार ऐनवेळी अनुपस्थित राहिल्यानेही त्यांना प्राधान्यक्रम बदलावा लागला. या अविश्वासाच्या वातावरणाचा किती व कसा परिणाम निकालात दिसून येणार याची चर्चा होत. सेनेचे सदाफुले की तांबे की दोघेही निवडले जातात याकडेच अधिक लक्ष राहणार आहे.