मुंबईपाठोपाठ ठाणे शहरातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असतानाच शहरातील वेगवेगळ्या भागांत गेल्या पाच महिन्यांमध्ये तपासणीदरम्यान चार हजारहून अधिक डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामध्ये अनियमित पाणीपुरवठा होणाऱ्या वागळे, रायलादेवी, कळवा तसेच मुंब्रा परिसर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. अनियमित पाणीपुरवठय़ामुळे या परिसरातील नागरिक पाण्याचा साठा करतात. मात्र, त्यामुळे डासांची पैदास होते, असे आरोग्य विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. 

ठाणे शहरामध्ये गेल्या पाच महिन्यांत ६८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम आणखी तीव्र केली आहे. याशिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी भेटी देऊन डासांच्या अळ्यांची तपासणी करीत आहेत. गेल्या चार महिन्यांतील तपासणीमध्ये चार हजार ११४ डासांच्या अळ्या सापडल्या असून त्या कर्मचाऱ्यांनी नष्ट केल्या आहेत. तसेच घरातील भांडी दररोज धुऊन कोरडी करून पाणी भरावे, असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरातील रायलादेवी, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा परिसर डासांच्या अळ्या सापडण्यामध्ये आघाडीवर आहेत. वागळेत ८१६, रायलादेवीत ९५९, मुंब््रयात ७५७ आणि कळव्यात ७२१ तर उर्वरित प्रभागात तुरळक डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. हे परिसर अत्यंत दाटीवाटीचे असून तिथे अनधिकृत इमारती, चाळी तसेच झोपडय़ा मोठय़ा प्रमाणात आहेत. वागळे परिसर काहीसा उंचावर असल्याने तिथे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या परिसरात अनियमितपणे पाणीपुरवठा असल्याने अनेक नागरिक पाण्याचा साठा करून ठेवतात. मात्र, या साठवलेल्या पाण्यावर डेंग्यूच्या डासांची पैदास होते. अशीच काहीशी परिस्थती कळवा आणि मुंब्रा परिसरात आहे, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. याच पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे आता जनजागृती मोहीम हाती घेतली असून त्यासाठी पोस्टर्स आणि भित्तिपत्रकांद्वारे डेंग्यू रोखण्यासंबंधी माहिती देण्यात येत आहे. याशिवाय बांधकाम सुरू असलेल्या विकासकांना नोटिसा बजावल्या असून साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या होऊ नयेत, यासंबंधी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच परराज्यातून कामासाठी येणाऱ्या मंजुरांची आरोग्यतपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. केंद्रे यांनी दिली.
नागरिकांना आवाहन
स्वच्छ स्थिर पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. त्यामुळे फुलदाण्या व शोभिवंत झाडांचे पाणी नियमितपणे बदला. पाणी साचेल अशा कोणत्याही अनावश्यक वस्तू ठेवू नका. घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नका, कुंडय़ांखाली असलेल्या बशा, फ्रिजचा डिफ्रॉस्ट ट्रे व वातानुकूलित यंत्राच्या डक्टमध्ये साचलेले पाणी काढून टाका, असे आवाहन डॉ. केंद्रे यांनी केले आहे.