शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ऐरोलीत आयोजित केलेल्या युवक-युवती सुसंवाद कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपण चौगुले कुंटुबीयांवर नाराज असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी चौगुले यांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही ठाकरे कुटुंबीयांनी चौगुले यांच्या कार्यक्रमाला ‘जय महाराष्ट्र’ केला असल्याचे दिसून येते. त्यामुळे मातोश्री चौगुले यांच्यावर नाराज असून नुकतेच शिवसेनेत आलेल्या मंत्री नाईक यांचे पुतणे वैभव नाईक यांना मातोश्रीचा आशीर्वाद लाभला असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई शिवसेनेत चांगलीच सुंदोपसुंदी सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चौगुले हे मागील ठाणे लोकसभा व ऐरोली विधानसभा निवडणुकीचे पराभूत उमेदवार असल्याने या चांगल्या दिवसांत त्यांची ऐरोलीतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांच्या दणदणीत विजयामुळे चौगुले यांचा विजय हा आता केवळ सोपस्कार राहिला असल्याची चर्चा चौगुले सर्मथक शिवसैनिकांत सुरू आहे. त्यामुळे चौगुले यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघ िपजून काढला आहे. त्यासाठी नाईकविरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरू असून, काँग्रेसचे स्थानिक पुढारी त्यांच्या हाताला लागले आहेत.
असे सर्व आलबेल वातावरण असतानाच सहा महिन्यांपूर्वी पालकमंत्री गणेश नाईक यांचे पुतणे माजी महापौर तुकाराम नाईक यांचे चिरंजीव वैभव नाईक यांनी मंत्री नाईकांना काही घरगुती आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादीचे घर सोडून त्यांनी वडिलांप्रमाणे शिवसेनेशी घरोबा केला. त्यामुळे चौगुले यांना एक तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झाला. वैभव यांचा ग्रामीण भागातील तरुणाईशी असलेला दांडगा संपर्क आपल्या पथ्यावर पडणारा असल्याचे चौगुले यांनी गृहीत धरले. त्यामुळे सुरुवातीच्या काळात गळ्यात गळा घालून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या चौगुले-नाईक जोडीतून सध्या विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. नाईक कुटुंबीयांचे नाव, ग्रामीण नाडी ओळखणारा आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या वैभव नाईक यांना सध्या मातोश्रीची फूस असल्याची चर्चा आहे.
चौगुले यांना इतकेदिवस पर्याय नसलेल्या शिवसेनेला नाईक यांच्या रूपात पर्याय मिळाल्याचे बोलले जाते. चौगुले यांचे खच्चीकरण करण्याचा पद्धतशीर कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यामुळे चौगुले यांनी अनेक वेळा आवतण देऊनही ठाकरे कुटुंबीयांपैकी नवी मुंबईत येण्यास कोणी राजी झाला नसल्याचे दिसून येते. नाईकांच्या राज्यात त्यांना टक्कर देत पक्ष वाढविण्याचे काम चौगुले यांनी गेली आठ वर्षे केले आहे. अच्छे दिन येण्याची वेळ जवळ आलेली असतानाच वैभव नाईक यांच्या रूपात चौगुले यांना बुरे दिन आणण्याची तजवीज केली जात असल्याने स्वारी नाराज आहे. रविवारी चौगुले यांनी युवक-युवती सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला जिल्ह्य़ातील सर्व नेत्यांनी हजेरी लावली, पण ज्यांच्यासाठी हा सर्व खटाटोप केला गेला होता त्या ठाकरे यांनी सपशेल पाठ फिरवली.
काही दिवसांपूर्वी वाशीतील भावे नाटय़गृहात झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात वैभव नाईक यांच्या स्वागताला पडलेल्या टाळ्यांचा गजर चौगुले सर्मथकांच्या डोक्यात टिकटिक करीत आहे. वैभव नाईक यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या ऐरोली, दिव्यातील दोन तरुण शिवसैनिकांना नुकताच चौगुले सर्मथकांनी प्रसाद दिल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीत असताना मंत्री नाईक यांच्या बरोबर संघर्ष केल्यानंतर ऐन विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर उमेदवारी जवळजवळ निश्चित असताना शिवसेनेत नव्याने आलेल्या दुसऱ्या नाईकाबरोबर संघर्ष करण्याची वेळ चौगुले यांच्यावर आली आहे. आदित्य ठाकरे यांनी केवळ आमचा कार्यक्रम रद्द केला नाही, तर जिल्ह्य़ातील इतर तीन कार्यक्रम रद्द केलेले आहेत. हा कार्यक्रम घेण्याची सूचना त्यांनीच ठाण्यात केली होती. त्यामुळे ते किंवा मातोश्री आमच्यावर नाराज असण्याचा काही प्रश्न येत नाही, असा खुलासा चौगुले यांनी ‘महामुंबई वृत्तान्त’शी बोलताना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौगुले यांची ‘शिवी’शाही मातोश्रीवर
मातोश्रीचा चौगुले यांच्यावर इतका राग का, अशी एक चर्चा केली जात आहे. त्यात पहिले कारण ऐरोली येथील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चौगुले यांचा मुलगा ममित याचे आदित्य ठाकरे यांच्या मावसभावाबरोबर झालेले भांडण व दुसरे कारण चौगुले यांच्या बरोबर ऊठबस करणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांच्या ‘शिवी’शाहीचे मोबाइलवर रेकॉर्डिग करून पाठविलेले चित्रीकरण. चौगुले यांच्या शिव्याशाप शहरात प्रसिद्ध आहेत.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War between vijay chougule naik family in navi mumbai
First published on: 07-08-2014 at 07:26 IST