दुष्काळाने त्राहि भगवान करून सोडणारा पाऊस येत्या वर्षांतील पूर्वार्धात चांगली हजेरी लावणार असला तरी उत्तरार्धातील अनिश्चितता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा धुंडाळायला लावणारा आहे. चत्र प्रतिपदेच्या मुहूर्तावर मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात िलबाच्या पारकट्टय़ावर पंचांग वाचनाचा कार्यक्रम होत असून, यंदाच्या पंचांगात पावसाची अनिश्चितताच अधोरेखित केली आहे.
यंदाच्या पावसाचा निवास माळय़ाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. चार अडक पाऊस म्हणजे पर्जन्यमान उत्तम आहे. चालू वर्षी दि. ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होत असून त्याचे वाहन हत्ती आहे. हत्ती वाहन पर्जन्यसूचक असले तरी सजल नाडीत एकही ग्रह नाही. या नक्षत्राचा पाऊस बऱ्यापकी व सार्वत्रिक होईल, असा अंदाज पंचांगात व्यक्त करण्यात आला आहे.
आद्र्रा नक्षत्रास दि. २२ जून रोजी प्रारंभ होत असून त्याचे वाहन बेडूक आहे. वारा सुटणे, ढग येणे व पाऊस पडणे या गोष्टी या नक्षत्रात अपेक्षित आहेत. दि. १९ जून रोजीची रवि, गुरू युती व दि. २१ जून बुध व शुक्र युती पर्जन्यकारक योग दर्शविते. पुनर्वसू नक्षत्रास दि. ६ जुलै रोजी प्रारंभ होत असून त्याचे वाहन गाढव आहे. या नक्षत्राच्या कालावधीत पर्जन्ययोग असून काही ठिकाणी पावसाचे मान चांगले राहील. दि. १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्र सुरू होत असून त्याचे वाहन कोल्हा आहे. या नक्षत्राचा पाऊस कोल्ह्याप्रमाणे लहरी असेल. काही ठिकाणी जोरदार सरी होतील.
दि. २ ऑगस्ट रोजी आश्लेषा नक्षत्र सुरू होत असून त्याचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्राचे पर्जन्यमान अल्पप्रमाणात आहे. पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके कुचंबण्याची भीती आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी महानक्षत्र सुरू होत असून याचे वाहन घोडा आहे. दि. २४ ऑगस्टच्या रवि, बुध युतीमुळे नक्षत्राच्या अंतिम चरणात पाऊस अपेक्षित आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या पूर्वा नक्षत्रात पर्जन्यकारक वरुण मंडल योग आहे. याचे वाहन मोर असून चांगले पर्जन्यमान दर्शविते. दि. १३ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्र सुरू होत असून त्याचे वाहन गाढव आहे. या नक्षत्राचे पर्जन्यमान मध्यम ते अल्प आहे. हस्त नक्षत्राचा प्रारंभ दि. २७ सप्टेंबर रोजी होत असून त्याचे वाहन बेडूक आहे. या नक्षत्राची पावसाला अनुकूलता राहणार असून जोरदार सरी अपेक्षित आहेत. मात्र काही ठिकाणी या पावसाची ओढ राहील. दि. १० ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या चित्रा नक्षत्राची वृष्टी खंडित असेल, तर दि. २४ ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या स्वाती नक्षत्राची पर्जन्यवृष्टी मध्यम प्रमाणाची आहे.
यंदाच्या पावसाळय़ातील पुष्य (कोल्हा), आश्लेषा (उंदीर), मघा (घोडा) ही वाहने असल्याने या नक्षत्रातील पाऊस बेभरवशाचा राहणार आहे. नक्षत्राचे वाहन हत्ती, मोर, गाढव, बेडूक असेल, तर पाऊस चांगल्या प्रकारे होतो, मात्र अन्य नक्षत्राचा पाऊस असमाधानकारक असतो, असे मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watching prediction of rain due to drought
First published on: 11-04-2013 at 01:20 IST