सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी धोक्यात आली असून, यात अखेरच्या क्षणी ‘तहान लागली म्हणून विहीर खोदण्याचा’ प्रयत्न महापालिका प्रशासनाने चालविल्याचे दिसून येते. शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी उजनी धरणातील पाणीसाठा राखून ठेवला असून हे पाणी केव्हा सोडायचे याचे नियोजनही झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी ४ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आता १ जानेवारी रोजी ४.५ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन होते. परंतु प्रत्यक्षात हे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पाणीपुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत या आढावा बैठकीतील चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच होते. तथापि, शहरात एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
उजनी धरण ते सोलापूर शहर थेट पाइपलाइन पाणीपुरवठा, दक्षिण सोलापूर तालुक्यातून भीमा-टाकळी पाणी योजना व शहरानजीकचे हिप्परगा जलाशय अशा विविध तीन पाणीपुरवठा योजनांद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो. यात दररोज उजनी थेट पाइपलाइन योजनेद्वारे ५५ दलघमी, भीमा-टाकळी योजनेद्वारे ५० दलघमी तर हिप्परगा जलाशयातून १० दलघमी याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. मात्र यापैकी भीमा-टाकळी योजनेतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने तेथून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाची आशा मावळली आहे. त्यामुळे शहरातील सुमारे ४० टक्के भागात पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे. या जलसंकटाला शहरातील जवळपास निम्म्या भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीप्रश्नावर नागरिकांची भावना संतप्त असून, प्रशासनाबरोबर स्थानिक नगरसेवकांना नागरिक शिव्यांची लाखोली वाहत असताना दिसून येतात. या परिस्थितीला पालिका प्रशासनाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. भीमा-टाकळी पाणी योजनेतील पाणीसाठा कमी होत असताना त्याकडे वेळोवेळी लक्ष देणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य होते. परंतु आता अखेरच्या क्षणी पळापळ चालली आहे. म्हणजे तहान लागली म्हणून विहीर खोदण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया सुजाण, करदात्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.
उजनी धरणातून शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी नियोजन यापूर्वीच ठरले असून, त्यानुसार कार्यवाही होत नसल्याने हे जलसंकट निर्माण झाले आहे. राज्याचे पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे हे सोलापूरचे पालकमंत्री असूनही त्याचा कसलाही उपयोग होत नाही, तर उलट, जलसंकटात पालकमंत्र्यांची भूमिकाही बेजबाबदार ठरल्याचे बोलले जाते आहे.