कोकणातील पाणी मुळा धरणात आणण्यासाठी सर्वानी एकत्र प्रयत्न केले तर सरकारला ही मागणी मान्य करावी लागेल, असे माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी सांगितले.    
पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची विखे यांनी पाहणी केली. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंतराव कापरे होते. माजी सभापती डॉ. टी. के. पुरनाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कापरे, मिठूभाई शेख, युवक काँग्रेसचे डॉ. अमोल फडके आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, दुष्काळ निवारण नव्हे तर दुष्काळ निर्मूलन परिषदा घेण्याची गरज आहे. पुढारी आश्वासने देऊन समाजाला विचाराने पंगू बनवत आहेत. तरुणांनी स्वत:चा विचार करावा. त्यांना दिशा दाखविली पाहिजे. बहुतेकांना समाजाची नव्हे तर पदांची चिंता आहे. उद्योगधंद्यांना रात्रीच्या वेळी विजेसाठी दिली जाणारी सवलत शेतकऱ्यांना का नको, असा सवाल विखे यांनी केला. जळालेल्या उसाचे अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत. ऊस संपल्यानंतर चाऱ्यासाठी लांबून गवत आणावे लागेल, असे ते म्हणाले.
शेतकरी व कार्यकर्ते यांच्याकडून विखे यांनी गावनिहाय अडचणींची माहिती घेतली. हातगावसह २८ गावांची रेंगाळलेली पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण व्हावी, जायकवाडी धरणावरील बंद उपसा योजनांच्या कर्जाचा बोजा, रोजगार निर्मिती आदी मागण्या उपस्थितांनी केल्या.
सुरेश कापरे यांनी प्रास्ताविक केले. अमोल फडके यांनी आभार मानले.