न्यायालयाच्या आदेशाने वालदेवी धरणग्रस्तांना मंजूर झालेल्या एकूण १६ कोटी २३ लाख ८४ हजार रुपये भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यातील काही रक्कम या वर्षी, तर उर्वरित रक्कम पुढील आर्थिक वर्षांत म्हणजे एप्रिल-मेनंतर देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले. धरणग्रस्तांच्या समस्यांविषयी तटकरे यांच्या उपस्थितीत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात बैठक झाली.
बैठकीस खा. समीर भुजबळ आणि आ. जयंत जाधव उपस्थित होते. त्या वेळी तटकरे यांनी हे आश्वासन दिले.
भुजबळ यांनी धरणग्रस्तांना प्रलंबित मोबदला तत्काळ देण्याची मागणी जलसंपदामंत्र्यांकडे केली. तसेच शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचे निर्देश नाशिकचे अपर जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे यांना दिले.
या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही  दिले. वालदेवी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधील गाळ काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदामंत्र्यांनी दिले.
बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव एकनाथ पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एम. के. पोकळे, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के, नाशिक तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी गायधनी, नगरसेवक शिवाजी चुंबळे, शेतकरी सुनील कोथमिरे, रामचंद्र खांडबहाले आदी उपस्थित होते.