पिढय़ान्पिढय़ा जल, जमीन, जंगल तसेच प्राणी जीवांचे रक्षण करणाऱ्या आणि निसर्गज्ञानाचे अथांग भांडार असलेल्या सातपुडा पर्वतराजीतील जनतेमध्ये पाण्याच्या थेंबा-थेंबाबद्दल जागरूकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी अक्राणी येथे पाणी जागृती परिषद होणार आहे. जिल्ह्याच्या दुर्गम डोंगराळ क्षेत्रात होणारी ही पहिलीच पाणी जागृती परिषद असल्याची माहिती जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरीया यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या परिषदेच्या निमित्ताने अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी विस्तृत स्वरूपात माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कांबळे यांसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महात्मा जोतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात सुरू करण्यात आले असून राज्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अक्राणी व अक्कलकुवा या सातपुडा पर्वतीय दुर्गम भागातील लोकसहभाग अधिक वाढविणे हा पाणी जागृती परिषदेचा उद्देश आहे. यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीचा अधिक उत्तम रितीने सामना करता येणे शक्य होणार आहे, तसेच टंचाईची परिस्थिती निर्माणच होणार नाही, यासाठीही मदत होणार आहे. परिषदेच्या निमित्ताने जलसंधारण कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अक्राणी येथील तालुका रोपवाटिकेसमोरील मैदानात सकाळी १० ते पाच या कालावधीत होणाऱ्या या पाणी परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांच्या हस्ते होणार आहे.  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. कुमूदिनी गावित, खा. माणिकराव गावित, आ. के. सी. पाडवी, आ. शरद गावित आदी उपस्थित राहणार आहेत. सातपुडा पर्वत क्षेत्रातील सर्व वाडय़ा-पाडय़ातील ग्रामस्थांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नायक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांबळे यांनी केले आहे.