मुळा धरणातून जायकवाडीकडे आज सकाळी पाणी झेपावण्यास सुरुवात झाली. सकाळी पाण्याचा वेग चार हजार नऊशे दहा क्युसेक्स एवढा होता. दुपारनंतर त्यात वाढ झाली. गुरुवारी सकाळी १० वाजेंपर्यंत हे पाणी पोहोचेल असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातून पाणी जायकवाडीच्या दिशेने निघाले असले, तरी त्याची वाट मात्र खडतर बनू लागली आहे. काही आंदोलनांमुळे प्रशासनाला विविध अडणींना सामोरे जावे लागत असले, तरी उद्या सकाळी भंडादरा व दारणा धरणातूनही पाणी सोडले जाणार आहे. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर मराठवाडय़ाला नाशिक व नगर जिल्ह्य़ातून ९ टीएमसी पाणी मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीसाठी अक्षरश: ‘आणिबाणी’ निर्माण करण्यात आली. प्रश्न नाहकच भावनिक बनविला गेला. बुधवारी मुळा धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले. संध्याकाळपर्यंत मांजरी बंधाऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडे होती. मुळा धरणातून जायकवाडीत २४ तासांत पाणी येईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. हे अंतर ५४ किलोमीटर एवढे आहे. उद्या दिवसभर पाण्याचा प्रवाह  सुरू राहील. त्यामुळे गुरुवारी पाण्याच्या पातळीत वाढ दिसण्याची शक्यता नाही. भंडारदरा व दारणा धरणातून सकाळी ८ वाजता प्रत्येकी ३ टीएमसी पाणी उद्या सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी पाणउपसा करू नये, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके तैनात करण्यात आलेली आहेत. ९ टीएमसी पाणी सोडल्यानंतर जायकवाडी जलाशयात साडेचार टीएमसी पाणी पोहोचेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. दरम्यान वरच्या धरणात आणि जायकवाडी धरणात समान जलपातळी असावी, अशी मागणी वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी आज केली.  भंडारदरा धरणातून उद्या सकाळी ८ वाजता ४ हजार ६०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाईल, तर दारणातून पाण्याचा वेग ५ हजार क्युसेक्स ठरविण्यात आला आहे. वरील धरणांतून पाणी सोडल्याने औरंगाबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.