जिल्ह्य़ात पुढील काळात गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार असल्याने त्यावर कमी कालावधीत परिणामकारकपणे  कशी मात करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी खा. समीर भुजबळ यांनी शिरपूरचा दौरा करून तेथील जलसंधारण कामांची माहिती घेतली. अशी कामे नाशिक जिल्ह्य़ातील टंचाई निवारणार्थ उपयोगी येऊ शकतील हे हेरून त्यासंदर्भात त्यांनी प्राथमिक तयारीही सुरू केली आहे.
नैसर्गिक पाण्याचे अत्यंत महत्वाचे स्त्रोत असलेले छोटे नाले, ओढे, शहरीकरणाच्या रेटय़ाखाली बुजतात अथवा बुजविले जातात. त्यामुळे परिसरातील नदीचे पावसाच्या पाण्याचे क्षेत्र कमी होते व शेवटी नदी कोरडी होते. हे दृष्टचक्र थांबविण्यासाठी आपल्या मतदारसंघातील नैसर्गिक ओढे, नाले जास्तीत जास्त खोल करणे, रुंद करणे व त्यावर कमी खर्चामध्ये परंतु मजबूत असे शक्य होतील तेवढे बंधारे बांधावेत, असे नऊ वर्षांमध्ये भरीव स्वरुपाचे कार्य आ. अमरीशभाई पटेल यांनी भूगर्भ विभागाशी संबंधित अनुभवी सुरेश खानापुरे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या शिरपूरमध्ये केले आहे. त्यामुळे शिरपूर तालुक्यात अंदाजे ८० टक्के सिंचन क्षमता वाढून दोन वर्षांपासून कमी पाऊस पडूनही शेतकरी वर्षांतून दोनदा-तीनदा यशस्वी नगदी पिके घेत असल्याचे या परिसरात दिसते. या जलसंधारण प्रकल्पाची पाहणी खा. भुजबळ यांनी केली. नाशिक जिल्ह्य़ातील काही अधिकारी तसेच सिन्नर तालुक्यातील शेतकरीही त्यांचे सोबत होते. खानापुरे आणि आ. पटेल यांनी दिवसभर त्यांच्याबरोबर थांबून या प्रकल्पाची माहिती दिली. नाशिक जिल्ह्य़ात हे काम सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य देण्याचेही कबूल केले. जिल्ह्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना भुजबळ फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची सक्रिय मदत घेण्याचा मानसही यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केला.