शहराची सुधारीत फेज-२ आणि केडगाव या पाणीपुरवठा योजनांच्या कामाला वेग देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या आज झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. या दोन्ही योजना निर्धारीत वेळेतच पुर्ण करण्याच्या सुचना महापौर शीला शिंदे व आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिल्या.
बैठकीतील निर्णयानुसार केडगाव येथील पाणीयोजनेतील २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येत्या दोन तीन दिवसात भरण्यास प्रारंभ करण्यात येणार असुन त्याबरोबरच प्रत्यक्ष चाचणीला प्रारंभ होईल. तसेच शहराच्या फेज-२ मधील दसरेनगर येथीलही २५ लाख लिटरची पाण्याची टाकी भरण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. दि. १५ जानेवारीपर्यंत हा कामे पुर्ण होतील. या टाक्यांची कामे पुर्ण झाली आहेत. केडगाव परिसरातील दुसरी ओंकारनगर येथील टाकीही लवकरच भरण्यात येईल.
मनपात झालेल्या या बैठकीस नगरसेवक दिलीप सातपुते, उपायुक्त महेशकुमार झगडे, यंत्र अभियंता परिमल निकम, योजनेच्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी अग्रवाल, सल्लागार संस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता व्ही. आर. कल्याणकर आदी उपस्थित होते. महापौरांनी या बैठकीनंतर केडगाव व शहराच्या फेज-२ योजनेच्या कामांची त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय व स्थायी समितीचीही मंजुरी मिळाली आहे. ही कामेही लवकरच सुरू होणार आहेत. त्यापुर्वी शहराच्या फेज-२ योजनेतील जलवाहिन्यांची कामे पुर्ण करण्याची ताकीद महापौर व आयक्तांनी यावेळी दिली. पाणीयोजनेच्या कामांसाठी रस्ते पुन्हा खोदावे लागणार नाहीत याची विशेष खबरदारी घेऊन तातजीने ही कामे पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. योग्य समन्वयातून ही कामे निर्धारीत वेळेत पुर्ण होतील असा विश्वास कल्याणकर यांनी बैठकीत व्यक्त केला.