भंडारदरा धरणातून पिण्यासाठी आज आवर्तन सोडण्यात आले. आता उद्या (शनिवार) शेतीसाठी आवर्तन सुरू होणार आहे. आज जलसंपदा विभागाने प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या १४ बंधाऱ्यात तीन फळ्या टाकून पाणी अडविण्यास संमती दिली.
भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यात येत असल्याने शेतीचे आवर्तन लांबणीवर पडले होते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दि. १० रोजी आवर्तन सोडण्यात येणार होते. पण, तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नव्हते. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला होता. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांची भेट घेऊन पिण्याचे व शेतीसाठी त्वरित आवर्तन सोडावे अशी मागणी केली. आमदार शंकरराव गडाख यांनी नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची मालिका भरून घ्यावी, असा आग्रह धरला होता. काल रात्री उशिरा मंत्री तटकरे यांनी आवर्तनाचा आदेश दिला.
आज प्रवरा डावा कालव्यातून ३०० क्युसेकने, तर उजव्या कालव्यातन १५० क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. आज सोडण्यात आलेल्या पाण्यातून पिण्याच्या पाणी योजनांचे उद्भव भरून घेण्यात येणार आहे. तर नदीपात्रात १ हजार ३०० क्युसेकने सोडलेल्या पाण्यातून १४ बंधाऱ्यात तीन फळ्या टाकून पाणी अडविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. रात्री नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद करून शेतीसाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. सात क्रमांकाच्या अर्जावर उभ्या पिकांना पाणी देण्यात येणार आहे. अधीक्षक अभियंता मनोहर पोकळे, कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ व उपअभियंता एस. के. थोरात यांनी बंधाऱ्यात पाणी अडविण्याच्या कामाची पाहणी केली. रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनात २ हजार ६०० ते २ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होणार आहे.