येथील एका दलित महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विधीमंडळात चर्चा घडवून आणू तसेच आरोपींना जर राजकीय संरक्षण मिळत असेल तर त्यांच्यावर एमपीडीए अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्तया आमदार नीलम गोऱ्हे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पिडीत महिलेस व तिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आमदार गोऱ्हे या शहरात आल्या होत्या. यावेळी विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी महिला तपास अधिकारी नेमावा, गुन्ह्याचा तपास विशेष सरकारी वकीलांच्या देखरेखीखाली व्हावा तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशा आशयाचे निवेदन आमदार गोऱ्हे यांना दिले.
पत्रकार परिषदेत आमदार गोऱ्हे म्हणाल्या, शहरातील एका दलित महिलेवर अत्याचार होऊन तीन दिवस पोलिसांना खबर मिळत नाही यात लोकल क्राईम ब्रँचचे अपयश आहे. तसेच  काहींनी पोलिसांना माहिती दिली होती. तपास करून ज्या पोलिसांना माहिती असुनही त्यांनी वरिष्ठांना कळविले नाही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी विधीमंडळात मागणी करू असे त्या म्हणाल्या.  जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी पिडीत महिलेच्या रोजगारासंबंधिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील सर्व दलित अत्याचाराची प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावीत अशी मागणी शासनाकडे वेळोवेळी केली असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करताना कोर्टाची कार्यपद्धती ठरली पाहिजे. याप्रकरणी इन कॅमेरा सुनावणी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बेकायदेशीर शस्त्रे, मानवी तस्करीशी या प्रकरणाचा संबंध आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पिडीत महिलेच्या अल्पवयीन मुलाला मारहाण झाल्यामुळे बालक अत्याचाराचे कलम लावण्याविषयी पोलिसांना सुचना केल्याचे त्यांनी सांगितले. काही आरोपी अजुनही फरार आहेत. या आरोपींची कोणालाही माहिती असल्यास तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना कळवावी, कळवणारांचे नाव पर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, रावसाहेब खेवरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते आदी यावेळी उपस्थित होते.