वयाची साठी हे खरंतर निवृत्तीचेच वय. एका अर्थाने निवांत जीवनाची सुरुवात. मात्र हेच वय गाठताना येथील एका उद्योजकाने त्याच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग आठ तास पोहण्याचा संकल्प करून नव्या पिढीला ‘साठी’चा आगळा संदेश दिला आहे.
नागापूर औद्योगिक वसाहतीतील अनंत इंडस्ट्रीजचे संचालक मोहन नातू यांनी हा संकल्प केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते बाराही महिने नियमितपणे पोहतात. दरवर्षी ते प्रजासत्ताकदिनी जास्तीतजास्त वेळ पोहून आपल्या तंदुरुस्तीची खातरजमा करतात. यंदा ते वयाची साठी गाठणार आहेत. ‘साठी’चे औचित्य साधून त्यांनी येत्या प्रजासत्ताकदिनी दि. २६ला सकाळी ८ ते दुपारी ४ असा सलग आठ तास पोहण्याचा संकल्प केला आहे. एमआयडीसी जिमखान्याच्या जलतरण तलावात ते हा उपक्रम करणार आहेत. पोहण्यातील आपले प्रेरणास्थान विठ्ठलराव सुद्रिक (वय ९३) आणि प्रा. हरिभाऊ तोडमल (वय ८८) या दोघांचे आशीर्वाद घेऊन हा उपक्रम करणार आहोत. हे दोघेही या वयात दररोज पोहतात, त्यांच्या प्रेरणेने नव्या पिढीला तंदुरुस्तीचा संदेश देण्याचा हेतू त्यामागे आहे असे नातू यांनी सांगितले.