शहरापासून आठ किलोमीटरवरील भालूर येथे शेताच्या बांधावर लावलेले सोन्याचे झाड (आपटय़ाचे झाड) विनापरवाना तोडून नेल्याच्या संशयावरून तीन जणांविरुद्ध मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी किरण रघुनाथ लहिरे यांनी तक्रार दिली. पाच जानेवारीला बांधावरील आपटय़ाचे झाड तोडल्याचे निदर्शनास आले होते. त्यापूर्वी पाच ते सहा दिवस आधी ही घटना घडली. भालूर शिवारातील गट क्रमांक ४५ मधील शेताच्या बांधाजवळ विहिरीलगत लावलेले १५ वर्षांपूर्वीचे आपटय़ाच्या पानांचे झाड आपली व वन विभागाची पूर्वपरवानगी न घेता तोडून नेल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्र्यंबक दगू लहिरे, दिगंबर त्र्यंबक लहिरे व दत्तात्रय त्र्यंबक लहिरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र वृक्ष संवर्धन कायदा १९६४ चे कलम चार अन्वये गुन्हा दाखल केला. त्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपटय़ाची पाने देऊन परस्परांना सोने वाटले जाते. बांधावर तोडण्यात आलेल्या या झाडाची दोन हजार रूपये अंदाजीत किंमत होती. आपटय़ाची पाने देऊन परस्परांमधील स्नेह वाढविला जातो. विनापरवानगी हे झाड तोडून त्याच्या मूळ उद्देशाच्या विपरित वर्तन घडल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे कुतुहल निर्माण झाले आहे.