* ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसांचे फलक अद्याप नाही
* डोंबिवलीच्या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूंना हवे वाहतूक पोलीस
विविध कामांच्या निविदा, कोणत्या कंत्राटदाराला काम द्यायचे या आणि अन्य गोष्टींसाठी महापालिका स्थायी समितीत म्हणजेच ‘स्टॅण्डिंग’ कमिटीमध्ये ‘अर्थ’पूर्ण ‘अंडरस्टॅण्डिंग’ करणारे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात आणि त्यांच्यावर मीटर डाऊन करण्यासाठी दबाव आणण्याकरता ‘अंडरस्टॅण्डिंग’ कधी दाखविणार, असा सवाल सुजाण प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.      
गेल्या काही दिवसांपासून ‘लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त’ने हा विषय लावून धरल्यामुळे ‘आरटीओ’, वाहतूक पोलीस खडबडून जागे झाले आहेत. आमदार रवींद्र चव्हाण यांनीही आठ ते दहा दिवसांपूर्वी डोंबिवलीत सर्व प्रमुख रिक्षा संघटनांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या सर्व प्रयत्नांमुळे रिक्षामीटरसक्ती दृष्टिपथात येऊ लागली आहे. पण कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांची मीटर डाऊन न करण्याची वर्षांनुवर्षांची सवय मोडून काढण्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनीही रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
डोंबिवलीचे आमदार रवींद चव्हाण आणि कल्याणचे आमदार प्रकाश भोईर यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या दोघा आमदारांनी कल्याण-डोंबिवलीतील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले तर आमदार महोदयांचे म्हणणे कोणी डावलणार नाही, याची प्रवाशांनाही खात्री आहे.
त्यामुळे दोघा आमदारांनी पुढाकार घेऊन कल्याण व डोंबिवलीत स्वतंत्रपणे एखादा दिवस ठरवून सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घ्यावे आणि रेल्वेस्थानक परिसरातील तसेच दोन्ही शहरांमधील गल्लीबोळातील प्रत्येक रिक्षातळावर जाऊन रिक्षाचालकांना मीटर डाऊन करण्याचे आवाहन करण्यासाठी फिरावे. यावेळी रिक्षासंघटनेच्या प्रमुख नेत्यांनाही बरोबर घ्यावे. रिक्षामीटर सक्तीच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय नेत्यांचे हे ‘अंडरस्ॅटण्डिंग’ एक आगळा प्रयोग ठरेल. त्याचा परिणाम रिक्षाचालकांची मानसिकता बदलण्यात होईल, असा विश्वास प्रवाशांना वाटत आहे.
डोंबिवली उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस
पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या डोंबिवलीच्या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला वाहतूक पोलिसांची डय़ुटी लावण्यात यावी. कारण हा उड्डाणपूल पार करावा लागतो, म्हणून डोंबिवलीतील रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानेल तसे भाडे उकळत असतात. या उड्डाणपुलावरून जाणारी प्रत्येक रिक्षा वाहतूक पोलिसांनी अडवून रिक्षाचालकाने मीटर डाऊन केले आहे की नाही त्याची तपासणी करावी. मीटर डाऊन केले नसेल तर कायद्यानुसार जो काही दंड असेल तो वाहतूक पोलिसाने वसूल करावाच, पण त्यावेळी त्या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा क्रमांक टिपून घेऊन ‘आरटीओ’कडे लेखी तक्रार करावी. अर्थात वाहतूक पोलीस हे काम करत असताना रिक्षात बसलेल्या प्रवाशानीही सहकार्य करावे. वाहतूक पोलिसांनी अशी धडक मोहीम काही दिवस राबवली तर रिक्षाचालकांनाही जरब बसेल आणि दंडाच्या रूपाने डोंबिवली वाहतूक पोलिसांकडेही मोठा महसूल जमा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीटर पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्याचे रिक्षा संघटनेचे आवाहन
कल्याण डोंबिवलीतील सर्व रिक्षा चालकांनी ई मीटर पद्धतीचा वापर करून प्रवासी वाहतूक करावी. मीटर पद्धतीने भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा रिक्षा चालकांना रिक्षा संघटना कोणतेही पाठबळ देणार नाही, असे आवाहन ‘रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन’चे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केले आहे.
रिक्षा चालकांना आवाहन करणारी, प्रवाशांच्या माहितीसाठी संघटनेने हजारो माहिती पत्रके प्रसिद्ध करून गेल्या आठवडय़ापासून त्याचे वाटप सुरू केले आहे. भागीदारी पद्धतीने ज्या रिक्षा वाहनतळावरून प्रवासी वाहतूक होते ते रिक्षा वाहनतळ वगळता अन्य सर्व रिक्षा वाहनतळावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी मीटर पध्दतीने वाहतूक करणे बंधनकारक आहे.
मीटर पद्धतीने भाडे नाकारणाऱ्या चालक, मालकास प्रथम एक हजाराचा दंड, नंतर दोन हजार रुपयांचा दंड आणि तिसरी तक्रार आरटीओला प्राप्त झाल्यास रिक्षेचा परवाना रद्द करण्यात येईल. त्या रिक्षा परमिटधारकास काळ्या यादीत टाकले जाईल, असे पेणकर यांनी माहिती पत्रकात म्हटले आहे.
आरटीओ, वाहतूक पोलिसांची मीटर भाडे नाकारणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू आहे. कारवाई झालेल्या चालकांना रिक्षा संघटना कोणतेही पाठबळ देणार नाही. सध्याची महागाई, इंधनाचे चढे दर पाहता प्रत्येक चालकाने प्रामाणिकपणे, प्रवासी हा अतिथी आहे समजून त्याच्याशी वाद न घालता प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन पेणकर यांनी केले आहे.

आवाहन रिक्षाचालकांना हवे
मोटारवाहन कायद्यानुसार मीटर डाऊन करणे हा नियम/कायदा फक्त कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांसाठी केलेला नाही. त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना नव्हे तर  रिक्षाचालकांना मीटर डाऊन करण्याचे आणि ते केले नाही तर काय दंड आहे, त्याची माहिती देणारे फलकही तातडीने रेल्वेस्थानक परिसरातील सर्व रिक्षातळ तसेच दोन्ही शहरांमधील लहान-मोठय़ा रिक्षातळांवर तातडीने लावावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the understanding between all party leaders and auto rickshaw
First published on: 29-03-2013 at 01:02 IST