डोंबिवली (प.) परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करणारे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे  लोकसत्ता ‘यशस्वी भव’ उपक्रमाअंतर्गत ‘परीक्षेला जाता, जाता’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद अरुणोदय सोसायटी या शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी ‘यशस्वी भव’च्या मार्गदर्शिका सुप्रिया अभ्यंकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान व गणित विषयाचे मार्गदर्शन केले. ज्या प्रश्नपत्रिकेच्या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे लेखन करावयाचे आहे, त्याच विषयाच्या अभ्यासाचा विचार परीक्षेला घरातून निघताना लक्षात घ्यावा. एखादे वेळेस आदल्या दिवसाची प्रश्नपत्रिका सोडविताना अवघड जाणवली असली तरीही दुसऱ्या दिवसाच्या प्रश्नपत्रिकेबाबत त्या विषयाचा विचार करू नका. कारण तुम्ही केलेला अभ्यास कदाचित तुमच्या गोंधळलेल्या मानसिक अवस्थेमुळे न आठवल्यामुळे, तुमच्यावर ‘ब्लँक’ होण्याची वेळ येऊ शकते.
अपेक्षित वेळेत प्रश्नपत्रिका सोडविणे त्यामुळे अवघड होऊ शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञान व गणित हे विषय सूत्रांवर आधारित आहेत. तसेच या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अचूक आकृत्या काढण्याचा सराव असणे आवश्यक असते. त्यामुळे परीक्षेचा सराव करताना या गोष्टींचा भरपूर सराव करणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सातत्याने होत राहावी, असे आमदार रवींद्र चव्हाण यांना नेहमी वाटत असते. त्यामुळे त्यांनी आपल्या बॅनर्समध्ये गुणवंत व्हा! यशवंत व्हा! असा संदेश दिला आहे. डोंबिवली (प.) परिसरातील काही निवडक शाळांमधून आमदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसत्ताच्या प्रती व ‘यशस्वी भव’ मार्गदर्शक पुस्तक प्रायोजित केले आहे.
कार्यक्रमस्थळी स्वामी विवेकानंद अरुणोदय सोसायटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. महाजन आणि पाटीलसर इत्यादी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While going for examination
First published on: 08-03-2013 at 12:20 IST