कधीकाळी शिखरावर असलेल्या आणि नंतर गटातटाच्या राजकारणामुळेच अधिक चर्चेत राहिलेल्या नाशिकच्या शिवसेनेस ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी अनेक प्रयत्न केले. शहरातील शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आपल्यावर अन्याय होत असल्याची जाणीव झाल्यावर थेट बाळासाहेबांकडे धाव घेऊन आपले गाऱ्हाणे मांडत असे. साहेब आपणांस हमखास न्याय देतील, हा विश्वास त्यामागे होता. साहेबांनी फटकारले तरी त्याबद्दल चकार शब्द न काढता पक्षाचे काम करीत राहण्यास प्राधान्य देणारे अनेक जण आहेत. साहेबांशी केवळ बोलण्यानेही अन्यायग्रस्तांना धीर मिळत असे. परंतु यापुढे अन्यायाविरोधात दाद तरी कोणाकडे मागणार, हा प्रश्न शहरातील माजी पदाधिकारी व शिवसैनिकांना अस्वस्थ करीत आहे.
राज्याची सत्ता मिळविण्यास नाशिकचे अधिवेशन कारणीभूत असल्याने बाळासाहेबांचा नाशिकच्या मंडळींवर विशेष लोभ. पदाधिकाऱ्यांमधील गुणदोष बाळासाहेबांच्या इतक्या परिचयाचे की, बऱ्याच वेळा आपल्यावर अन्याय झाला म्हणून ‘मातोश्री’वर धाव घेतल्यावर साहेबांकडून त्याचीच खरडपट्टी काढली जात असल्याचे किस्से प्रसिद्ध आहेत. शिवसेनेमुळे श्रीमंती आलेल्या  एका पदाधिकाऱ्याने तर विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधातच उमेदवारी अर्ज भरण्याची हिंमत दाखविली होती. त्यानंतर नाशिकचे कोणीही पदाधिकारी बाळासाहेबांकडे गाऱ्हाणे घेऊन गेले की, त्यांच्याकडून पक्षाविरोधात जाणाऱ्या त्या पदाधिकाऱ्याची खास ‘ठाकरी’ शैलीत विचारपूस होत असे. स्थानिक शिवसेनेत प्रचंड प्रमाणात गटबाजी वाढून त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये भोगावा लागत असल्याचे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. वयोमानामुळे बाळासाहेबांचे दौरे बंद झाल्यानंतर गटबाजी अधिकच फोफावली. नाशिकमधील गटबाजी कधी मिटेल, याची साहेबांना चिंता होती. त्या काळजीपोटी ते सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करीत.
शिवसेनेच्या इतर नेत्यांकडूनही आपणांस न्याय मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर पदाधिकाऱ्यांना बाळासाहेबांचा मोठा आधार वाटे. ‘आता साहेबांपुढेच कैफियत मांडेन’ किंवा ‘आता जे काही करायचे ते साहेबच करतील’ असा साहेबांच्या नावाने प्रेमळ दमही दिला जात असे. काही वेळा तर बाळासाहेब स्वत:हून अशा मंडळींना बोलावून घेत. स्थानिक पातळीवर कोण, किती प्रमाणात पक्षाचे काम करीत आहे, याची माहिती त्यांच्याकडे राहात असे. ‘तुम्हाला जी पदे मिळाली, जी श्रीमंती मिळाली, ती शिवसैनिकांमुळे. त्यांनी केलेल्या कष्टामुळे. त्यामुळे सदैव त्यांची आठवण ठेवा, त्यांना जपा’ असा सल्ला ते पदाधिकाऱ्यांना देत.
यापुढे आपल्यावर अन्याय झाल्यास कोणापुढे गाऱ्हाणे मांडणार, आपले म्हणणे कोण ऐकून घेणार, आपणास कोण धीर देणार, अशा असंख्य प्रश्नांचे काहूर शिवसैनिकांसह माजी पदाधिकाऱ्यांमध्ये उठले आहे.