‘यह जवानी है दिवानी’च्या एकूण रागरंगाकडे पाहताना रसिकांच्या एका पिढीला ‘खेल खेल में’ आठवतोय..
रवी टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल में’ प्रदर्शित होण्यापूर्वीही १९७४ साली असेच खेळकर-खोडकर-मजेशीर वातावरण होते.
ऋषी कपूर व नीतू सिंग ही त्या दशकातील सर्वाधिक देखणी व बहुचर्चित अशी जोडी! या जोडीला यशस्वी होण्यासाठी एका तरुण चित्रपटाची गरज होती. ‘खेल खेल में’पूर्वी ऋषी कपूर ‘बॉबी’मुळे ‘युवा दिलों की धडकन’ झाला असला तरी ‘झहरीला इन्सान’च्या अपयशाने त्याच्या वाटचालीत अडथळा आला. त्यात मोसमी चटर्जी व नीतू अशा त्याच्या दोन नायिका होत्या. नीतू सिंग ‘रिक्षावाला’ चित्रपटाद्वारे बालकलाकाराची नायिका झाली तरी मोठी झेप घेण्यासाठी एका अस्सल यशस्वी चित्रपटाची गरज होती. हिंदी चित्रपटाच्या जगात यशासारखे सुंदर व महत्त्वाचे दुसरे काहीही नाही.
‘खेल खेल में’ हा रहस्यमय संगीतमय खेळकर चित्रपट असल्याने पहिल्या दिवसापासूनच त्याने ‘गल्लापेटी’वर पकड बसवली. विशेषत: संगीतकार राहुल देव बर्मन यांची ‘हमने तुमको देखा’, ‘एक मैं और एक तू’, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. राकेश रोशन, अरुणा इराणी, इफ्तिकार व देव कुमार यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. मराठा मंदिर हे तेव्हा या चित्रपटाचे प्रमुख चित्रपटगृह होते. तेथेच त्याने रौप्यमहोत्सवी यश संपादन केले.
या यशासह ऋषी कपूर व नीतू सिंग ही जोडी छानच जमली. इतकी की, ‘ते एकमेकांसाठीच आहेत’ असे त्या ‘जोडी’कडे पाहताना वाटू लागले. या जोडीने मग ‘जिंदादिल’, ‘झूठा कही का’, ‘अमर अकबर अॅन्थनी’, ‘धन दौलत’ इत्यादी चित्रपटांतून भूमिका साकारताना एकमेकांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणूनही ठरवून टाकले.  रणबीर-दीपिका ही जोडीदेखील अशीच छान जमलीय. तूर्त तरी ‘सिनेमा’साठी आहे, पण काय सांगावे, दोघांच्या पुढील प्रवासात काय आहे ते? त्याचे नाव कतरिनाशी जोडले जाते, तरी दीपिका ‘त्याची’ सखी म्हणून जास्त शोभते.  ..‘खेल खेल में’ यशस्वी ठरताच ऋषी कपूर-नीतूच्या नात्याला मोठा आधार मिळाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘यह जवानी है दिवानी’ यशस्वी ठरला तर रणबीर-दीपिकाच्या नात्यालाही योग्य ‘खतपाणी’ मिळेल. यशासारखे महत्त्वाचे दुसरे काही नसते म्हटल्यावर काय हो? सगळे कसे ‘खेल खेल में’ जमून जाते. ‘बचना ए हसीनों’च्या अपयशातून रणबीर-दीपिकाला बाहेर यायचे आहेच म्हणा.