मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
गोदावरी नदीला २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर नदीकाठचा काही भाग पूररेषेत येत असल्याचे जाहीर करण्यात आल्याने या भागातील लाखो मिळकतधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पूरनियंत्रण रेषेच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. पूररेषेच्या नावाखाली बांधकामांना परवानगी देण्यात येत नसताना गोदातीरी होणाऱ्या सिंहस्थाच्या कामांवर कोटय़वधींचा खर्च कसा केला जातो, असा प्रश्न भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे शहर अध्यक्ष हेमंत जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ मध्ये नदीचे पाणी शहराच्या काही भागांत शिरले होते, तर काही भागांत गटारींचे पाणी शिरले होते. त्यानंतर शहराचा गावठाण भाग असलेला सराफ बाजार, कापड बाजार, दहीपूल, हुंडीवाला लेन, जुने नाशिकमधील काही भाग, व्यापारी पेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या रविवार कारंजाजवळील काही भाग हा पूररेषेत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे लाखो मिळकतींचे भाव कोसळले. या भागात सरस्वती नाला वाहतो. या नाल्याची कधीही स्वच्छता केली जात नाही. पावसाळ्यात ते तुंबते आणि त्यावर लावण्यात आलेल्या जाळ्यांमधून ते पाणी बाहेर पडते. नाशिकमधील नाल्यांचे पाणी रामसेत पुलालगत असलेल्या बालाजी मंदिराजवळून सोडले जाते. पुराचे पाणी या बालाजी कोटखाली असलेल्या नाल्यात शिरल्यावर नाल्यातील पाणी पुढे जाऊ शकत नाही.
पूर्वजांनी भविष्यातील सर्व धोके लक्षात घेऊनच नदीकाठी घरांची उभारणी केलेली आहे. असे असताना पूररेषेच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला आहे. २००८ मध्ये आलेला महापूर मानवनिर्मित असल्याचे पालकमंत्र्यांनी म्हटले होते. महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांनी धरणातील पाण्याच्या पातळीचा विचार करून थोडे थोडे पाणी सोडले असते तर महापूर आला नसता, असेही म्हटले गेले. शहरातील नाल्यांची सफाई करायची नाही. नदीतील घाण काढायची नाही. सिंहस्थाच्या नावाखाली नदीत बांधकाम होत असताना त्याकडे होणारी डोळेझाक योग्य नाही. पूररेषेत असलेल्यांनी काही प्रमाणात दुकानांची किंवा घरांची दुरुस्ती करण्याचे ठरविले तरी पूररेषेचे कारण पुढे करून अडवणूक केली जाते. या पूररेषेच्या घोषणेमुळे परिसरातील मिळकतींच्या किमती कवडीमोल झाल्या आहेत. पूररेषा तयार करताना या भागातील नागरिकांना विचारात घेण्याची गरज होती. दरवेळी किरकोळ पाऊस जरी झाला तरी नाल्यांची स्वच्छता न झाल्यामुळे जिजामाता रोड, सराफ बाजार, दहीपूल, हुंडीवाला लेन या परिसरांतील दुकानांमध्ये पाणी शिरते. मग यास गोदावरीला आलेला पूर म्हणावे काय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
पूररेषा आखताना ती कशी आखायला हवी, त्याचे निकष कोणते, पूररेषेमुळे काय समस्या निर्माण होतील याचा कोणताही अभ्यास संबंधितांनी केला नाही. पूररेषेत बांधकामांना परवानगी दिली जात नाही. काही भागात काही फुटांच्या उंचीची अट घालून इमारत बांधावी, अशा विविध अटी घातल्या जात असल्याचे जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why to spend cores on flood line areas
First published on: 31-07-2014 at 08:34 IST