उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून दिवसभर बोचरा वाराही वाहत असल्यामुळे गारव्याचे अस्तित्व चांगलेच अधोरेखीत होत आहे. रविवारी हंगामातील नीचांकी म्हणजे ४.४ अंश इतके तापमान नोंदविले गेल्यानंतर सोमवारी त्यात दोन अंशांनी वाढ होऊन ६.४ अंश तापमानाची नोंद झाली. थंडीच्या लाटेचा विपरित परिणाम द्राक्षांवर होणार असल्याने उत्पादकही धास्तावले आहेत.
उत्तरेकडे बर्फवृष्टी सुरू असताना त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे.
गारठून टाकणाऱ्या थंडीने सर्वसामान्यांना हुडहुडी भरली असताना दिवसाही गारव्याचे अस्तित्व कायम राहिले. उत्तर महाराष्ट्रात सलग दोन दिवसांपासून वातावरणाचा हा नूर कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद झालेल्या नाशिक प्रमाणेच जळगाव, धुळे व नंदुरबार येथील तापमानातही झपाटय़ाने घट झाली. जानेवारीपासून थंडीने आपले अस्तित्व दाखविण्यास सुरूवात केली. दोन दिवसांपासून तर थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. थंडीने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र गारठला असताना तापमानाने हंगामातील नीचांकी पातळीची नोंद केली आहे. मागील आठ वर्षांतील नीचांकी पातळीवर नजर टाकल्यास उत्तर महाराष्ट्रात तापमानाची खरी घसरण ही प्रामुख्याने जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये झाल्याचे दिसते. यंदा, ही परंपरा राखली गेली. रविवारी नाशिकच्या तापमानाने हंगामातील सर्वात कमी म्हणजे ४.४ अंश सेल्सिअसची नोंद केल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.
कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. एरवी जी दुकानेा सकाळी दहाच्या सुमारास उघडत असत, ती अकराच्या दरम्यान उघडू लागली आहेत. सकाळ सत्रातील काही शाळांनी याआधीच आपल्या वेळेत बदल केले आहेत. दहा दिवसांपूर्वी ढगाळ हवामानामुळे उकाडा होत असल्याने उबदार कपडे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. परंतु थंडी परतल्याने पुन्हा एकदा त्यांच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. रात्रंदिवस गारवा जाणवत असल्याने संपूर्ण शरीर उबदार कपडय़ांमध्ये लपेटूनच प्रत्येक जण घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. नीचांकी तापमानाबरोबर सोमवारी नाशिक शहर व परिसर धुक्याच्या दुलईत लपेटला गेल्याचे पहावयास मिळाले.
उत्तर महाराष्ट्रातील थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. थंडीचा कडाका असाच कायम राहिल्यास द्राक्षाच्या झाडाची चयापचय क्रिया मंदावते. म्हणजे झाड उभे असते, पण ते कोणतेही काम करीत नाही. परिणामी, द्राक्ष मण्यांची फुगवण प्रक्रियाही होत नाही. म्हणजे थंडीच्या लाटेपूर्वी १० मिलीमीटरचा मणी असल्यास तो गारवा कायम असेपर्यंत तेवढाच राहतो, अशी माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी विजय गडाख यांनी दिली. यंदा द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या निफाड, नाशिक तालुक्यांमध्ये तापमानाच्या वेगवेगळ्या नोंदींमुळे आधीच उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक द्राक्ष उत्पादकांनी खासगी कंपनीमार्फत स्वयंचलीत तापमान नोंदणी यंत्रणा  बागांमध्ये बसविली आहे. या केंद्रांच्या नोंदी वेगवेगळ्या येत असल्याने द्राक्ष पिकांची निगा राखताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वातावरणात पावसाचा थोडाफार शिडकावा झाल्यास द्राक्षमणी फुटण्याची शक्यता असते. धुक्यामुळे झाडावर ओलसर दव निर्माण होते. त्यामुळे पान, घडावर भुरी रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रार्दुभाव झाल्याचे त्यांनी नमूद केले.