दसरा-दिवाळी आटोपली आणि वेध लागले ते थंडीचे. नीलम वादळाने काही काळ थंडीच्या मोसमाची जाणीव करून दिली, मात्र थंडी ओसरली. आता पुन्हा दिवाळी संपता संपता विदर्भात थंडीने डोके वर काढून तिचे अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी बांधबुंध करून ठेवलेले कपाट आणि दिवाणमधील स्वेटर, शॉल, कानपट्टय़ा, हातमोजे, जॅकेट वगैरे गृहिणींनी बाहेर काढायला सुरुवात केली आहे. सुर्योदयाच्या आणि सुर्यास्ताच्या वेळातही बदल झाले असून लवकर थंडी पडू लागल्याने सातच्या आत घरात जाण्याचा चाकरमान्यांचा दिनक्रम आणखी अलीकडे आला आहे. सकाळच्या थंडीत उन्हाची तिरीप अंगावर घेणे किंवा शेकोटीजवळ उभे राहून उष्णता संपादित करण्याकडे नागरिकही सरसावले आहेत.
तसे पाहिले तर विदर्भात असह्य़ होणारी थंडी फार कमी पडते. अतिशय तीव्र उन्हासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात थंडीही अल्पकाळ का होईना वैदर्भीयांना चांगलीच गारठून टाकते. नागपूरचे आजचे दिवसाचे तापमान २९ डिग्री सेंटिग्रेड नोंदवण्यात आले आहे. येत्या रविवापर्यंत पारा एक-दोन डिग्रीने कमी जास्त होण्याची शक्यता आहे, मात्र वातावरणात गार वारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नोव्हेंबरच्या मध्यावर थंडीने डोके वर काढल्याने येत्या काही दिवसांमध्ये तिची तीव्रता अधिक राहील. गेल्या वर्षी तर एक जानेवारीपासून म्हणजे उशिरा थंडीने विदर्भाला गारठून टाकले होते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंडीच्या मानाने कोरडाच गेला होता. त्या तुलनेत यावर्षी दसऱ्या दिवाळीत थंडीचे थोडेफार अस्तित्व दाखवले होते. गेल्या दोनतीन दिवसांपासून थंडीचे अस्तित्व नियमितता दिसत असल्याने थंडी जाणवायला लागली किंवा थंडीचे दिवस सुरू झाले, अशी वाक्य कानावर पडू लागली. गेल्या वर्षी तर प्रत्येक महिन्यात पावसाने हजेरी लावली होती, मात्र यावर्षी हवामानाने शिस्तीत, नेमून दिलेल्या महिन्यांमध्ये हजेरी लावत उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याचे त्या त्या ऋतूतील आनंद मनसोक्त उपभोगण्यास हातभार लावला.
स्वेटर विकणाऱ्यांनी तर नागपुरातील वेगवेगळ्या भागात केव्हाच हजेरी लावली आहे. विदर्भातील बाजारपेठेसह नागपुरातही सीताबर्डी, महाल, इतवारी, आशीर्वाद टॉकीजच्या मागे, धरमपेठ, धंतोलीच्या ठिकाणी दुकाने सजली आहेत. जसजशी थंडी वाढेल तसतसे नागपूरकर त्या दुकानांकडे धाव घेतील, असा त्यांचाही अनुभव असल्याने सध्या थंडीतही त्यांचा धंदा थंड असला तरी लवकरच स्वेटरची गजबजलेली दुकाने सावरता सावरता त्यांनाही नाकी नऊ येईल.