देशाची अर्थव्यवस्था अधिक प्रमाणात कृषी विकासावर अवलंबून असल्याने या क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य असल्याचे मत खा. हरिभाऊ जावळे यांनी व्यक्त केले. येथील नाहाटा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपात ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, परिषदेचे अध्यक्ष डॉ. के. के. पाटील यांसह स्वागताध्यक्ष मोहन फालक, प्राचार्य डॉ. एम. व्ही. वायकोळे, महेश फालक आदी उपस्थित होते. अधिवेशनातील चर्चासत्रात कृषी विकासाचा समावेश नसल्याबद्दल खा. जावळे यांनी खंत व्यक्त केली.
कृषी व अर्थशास्त्र हे एकमेकांना पूरक आहेत. परंतु देशाचा विकासदर वाढत असताना कृषी विकासदर हा कमी असण्याची कारणे काय, यावर मंथन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित अर्थशास्त्र विषयाच्या ४०० प्राध्यापक व विद्यार्थ्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात पुणे येथील डॉ. शर्मिष्ठा सातव यांनी मनोगत व्यक्त केले.
अधिवेशनात १५० जणांनी निबंध सादर केले. मुंबईच्या प्रा. सुधा मोकाशी यांनी एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश खा. जावळे यांच्या उपस्थितीत परिषदेस दिला. तसेच ३७ वे अधिवेशन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे पुढील वर्षी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. अधिवेशनात ३७ व्या राष्ट्रीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रा. जे. एस. पाटील यांची निवड करण्यात आली.