दोन दिवसाच्या तान्हुलीला टॉवेल आणि शॉलमध्ये गुंडाळून मंदिराच्या अडगळीच्या कोपऱ्यात टाकून एक महिला पसार झाल्याची खळबळजनक घटना दिग्रस येथील घंटीबाबा मंदिरात सोमवारी उघडकीस आली.
मंदिर परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे एक बाब स्पष्ट झाली की, या महिलेसोबत एक तरुणसुध्दा होता आणि त्या दोघांनी घंटीबाबा मंदिरात दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून आजुबाजूला कोणीही नसल्याची संधी घेत त्या तान्हुल्या मुलीला मंदिराच्या अडगळीच्या कोपऱ्यात टाकून पोबारा केला.
 सेवानिवृत्त मुख्याध्यापक उध्दव अंबुरे, सुभाष जाधव यांच्या दृष्टीस ही मुलगी पडली तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. ठाणेदार वा.घु. खिल्लारे व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रशांत रोकडे यांनी घटनास्थळी येऊन त्या चिमुकलीला ताब्यात घेतले.   कमालीची थंडी असलेल्या वातावरणात मुलीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी व डॉक्टरांनी सर्व ते प्रयत्न केले. त्यामुळे तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी के.बी. बानोत, परिचारिका शीतल बोडगे, जमादार वनदेव कापडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल नालमवार, जी.डी.चव्हाण यांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. ६ पौंड वजनाच्या या चिमुकलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घंटीबाबा मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने ही घटना कैद केली असली तरी फुटेज स्पष्ट नसल्यामुळे आरोपींना शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे झाले आहे.