ओळखीच्या कुटुंबातील सात वर्षे वयाच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिलेने पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जनता वसाहतीत ही घटना घडली. या घटनेत ही महिला शंभर टक्के भाजली असून, संबंधित मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही.
जैगून फरीद शेख (वय ३३, रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत, पुणे.) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सुमन भाऊसाहेब मरगळे (वय २८, रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत, पुणे.) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा ओंकार याच्या अपहरणाचा गुन्हा जैगून शेख हिच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरगळे व जैगून यांचे अनेक दिवसांपासून घरगुती संबंध आहेत. जैगूनने मरगळे यांच्याकडून सहा महिन्यांपूर्वी ४० हजार रुपये उसणे घेतले होते. त्याचप्रमाणे नातेवाइकाच्या विवाहाला जाण्यासाठी सोन्याचे एक गंठणही नेले होते. मात्र, ते परत केले नव्हते. ओंकारचे वडील भाऊसाहेब हे भाजी विक्रीचा व्यावसाय करतात. ११ नोव्हेंबरला ते बाजारातून परतत असताना मुलगा ओंकार हा जैगूनसोबत जात असताना त्यांनी पाहिले होते. मुलाला फिरवून आणते असे जैगूनने सांगितले होते. बराच वेळ उलटून गेल्यावरही ओंकार घरी न आल्याने जैगूनच्या घरी जाऊन त्याबाबत चौकशी केली केली. मात्र, खाऊसाठी पैसे दिल्यानंतर ओंकार घरी परत गेला, असे तिने सांगितले. त्यामुळे बराच वेळ जनता वसाहतीच्या परिसरामध्ये ओंकारचा शोध घेण्यात आला. तो न सापडल्याने १२ नोव्हेंबरला ओंकार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्याचप्रमाणे जैगून हिनेच मुलाचे अपहरण केल्याचेही तक्रारीत म्हटले होते. ओंकारबाबत चौकशी करण्यासाठी २५ नोव्हेंबरला भाऊसाहेब पुन्हा तिच्या घरी गेले होते. त्यानंतर काही वेळाने घरात कोणी नसताना जैगून हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ती शंभर टक्के भाजली असून, ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
मुलाच्या अपहरणाच्या गुन्ह्य़ानंतर आरोपी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
ओळखीच्या कुटुंबातील सात वर्षे वयाच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिलेने पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जनता वसाहतीत ही घटना घडली. या घटनेत ही महिला शंभर टक्के भाजली असून, संबंधित मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही.
First published on: 27-11-2012 at 03:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women tries for suside after kidnaping case of child