सिडकोतील काही भागांमध्ये अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठय़ाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून संतप्त महिलांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
पंडितनगर, शिवपुरी चौक, उत्तमनगर या भागातील नागरिकांना आठ दिवसांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कधी पाणीच न येणे तर कधी अनियमित व अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, यामुळे महिलावर्ग त्रस्त झाला आहे. सोमवारी महिलांमधील या असंतोषाचा कडेलोट झाला. नगरसेविका रत्नमाला राणे आणि डी. जी. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी विभागीय कार्यालय गाठले. परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थेतील गलथानपणाबद्दल जाब विचारत त्यांनी या व्यवस्थेत त्वरीत सुधारणा करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत पाणी पुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. सिडकोतील काही भागात पाणी समस्या ही नेहमीची झाली असून कमी दाबाने नळांना पाणी येत असल्याने महिलावर्ग अधिकच वैतागला आहे. ही समस्या यापुढे अधिकच बिकट होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नी त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.