नवी मुंबईच नव्हे तर मुंबई, ठाणेकरांनाही पर्यटनाचे नवे दालन उपलब्ध करून देऊ शकेल, असे ‘वंडर्स पार्क’ येत्या १५ डिसेंबरपासून नेरुळ येथे खुले होत आहे. नवी मुंबई महापालिकेने सायन-पनवेल महामार्गास लागूनच अ‍ॅम्युझमेंट पार्कच्या धर्तीवर हे विस्तीर्ण असे पार्क तयार केले असून त्यावर सुमारे ३९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सुमारे एक लाख चौरस मीटरच्या विस्तीर्ण अशा भूखंडावर उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्याच्या भव्य अशा प्रतिकृती उभारण्यात आल्या असून जागतिक दर्जाशी स्पर्धा करू शकतील अशी लहान मुलांची खेळणी या ठिकाणी बसविण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र उभे राहवे यासाठी नवी मुंबई महापालिकेने तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची आखणी केली. प्रसिद्ध वास्तुविशारद हितेन सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भल्या मोठय़ा उद्यानाची आखणी सुरुवातीला लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली. शीव-पनवेल महामार्गास लागूनच असलेल्या या उद्यानाची उभारणी करत असताना त्याचा विकास सर्वसामावेशक असे पर्यटन केंद्र म्हणून करावा, असे पुढे ठरले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजीव नाईक यांनी सुमारे ९८ लाखांचा खासदार निधी या प्रकल्पासाठी देऊ केला. हा खासदार निधी देत असताना या उद्यानाची मूळ संकल्पनाच बदलण्यात आली. जगातील सात आश्चर्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जावी, असे ठरले आणि बघता बघता एका आगळ्यावेगळ्या पर्यटनस्थळाचा नवा ढाचा या ठिकाणी उभा राहिला. काम सुरू करताना या प्रकल्पाला ‘चिल्ड्रेन पार्क’ असे नाव देण्यात आले होते. मात्र, सात आश्चर्याच्या प्रतिकृतीमुळे आता हा प्रकल्प ‘वंडर्स पार्क’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांनी वृत्तान्तला दिली. मुंबई-पुण्याच्या मधोमध असे एखादे पर्यटनस्थळ उभारले जावे, अशी या प्रकल्पामागील मूळ कल्पना आहे. मुंबईतील अ‍ॅम्युझमेंट पार्कमधील प्रवेश महाग आहे. त्यामुळे तुलनेने स्वस्त दरात या ठिकाणी आबालवृद्धांना वेगवान राईडस्, हायटेक मिनी ट्रेन, अ‍ॅम्पी थिएटरची सैर अनुभवता येईल असा दावाही डगावकर यांनी केला.
सिडकोने खारघर येथे लंडन येथील हाईड पार्कच्या धर्तीवर उभारलेले सेंटर पार्क सध्या सर्वाचे आकर्षण ठरले आहे. सेंटर पार्कपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरुळ येथील या वंडर्स पार्कला अ‍ॅम्युझमेंट पार्कचा दर्जा देण्यात आल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांची मजाही लुटता येणार आहे. या पार्कमध्ये सुमारे एक हजार आसनक्षमता असलेले अ‍ॅम्पी थिएटर उभारण्यात आले असून ७५० मीटर आकाराच्या चार टॉय ट्रेन या ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. विस्तीर्ण अशा या पार्कमध्ये लहान लहान तलाव निर्माण करण्यात आले असून या ठिकाणी स्वस्त दरात प्रवेश मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार नाईक यांनी दिली. वंडर्स पार्कमधील प्रवेशाचे दर निश्चित झाले नसले तरी सर्वसामान्यांना परवडतील असेच असतील, असा दावाही नाईक यांनी केला.