गाणे गाताना ते सुरेल असण्याबरोबरच त्यातील शब्द आणि भावना या रसिकांपर्यंत पोहेचणे अतिशय महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांनी ठाणे येथे केले. येथील अत्रे कट्टय़ावर आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी आपल्या विनोदी शैलीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
गाणे गाताना त्यातील अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. तसेच गाण्यातील भावना आणि शब्दांमधील प्रत्येक अक्षर यांना महत्त्व देण गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. शालेय जीवनात असताना जयसिंग राठोड या मित्राबरोबर आकाशवाणीसाठी नोकरीची मुलाखत दिली होती. तेव्हा संगीतकार अनिल विश्वास यांचे एक गाणे सतारीवर वाजविले. तेव्हापासून आपल्या संगीत कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे त्यांनी सांगितले. ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली त्यावेळी स्वत:मधील कौशल्यास पदवीची जोड असणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करताना अनेकांच्या कवितांमध्ये सुधारणा करत मी स्वत:च कवी बनलो असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना देव यांनी सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याविषयीच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
यावेळी त्यांनी आपल्या ‘पत्नीची मुजोरी’ काव्यसंग्रहातील विविध गाणी त्यांनी गाऊन दाखवली. पती-पत्नीमधील नात्यावर आधारित विनोदी स्वरूप   या काव्यसंग्रहात आहे. यावेळी प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवर त्यांचे गायन देव यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. या गाण्यांची सीडी लोकप्रिय झाल्यानंतर विडंबन गाण्यांचे कार्यक्रम सुरू झाले असे त्यांनी सांगितले. आयुष्यात कठीण आणि अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना नेहमीच सामोरे गेलो आणि यातील विविध प्रसंगातून स्वत:ची जडणघडण केली. यामुळे संगीत क्षेत्रातील आजपर्यंतचा प्रवास करू शकलो असे त्यांनी सांगितले. अनंत मराठे यांनी देव यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती होती.