सरोवराचे सुशोभीकरण
शहरातील सलीम अली सरोवर सुशोभीकरणासाठी नेमलेल्या ठेकेदाराने संथगतीने काम केल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला. ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा ५ महिने उशीर झाल्याचे महापालिकेचे अधिकारीही मान्य करतात.
मुख्य द्वार सुशोभीकरणाचे काम अजूनही बाकी असून ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी बीओटी तत्त्वावर ठेकेदाराची निवड करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. शिवसेनेच्या काही सदस्यांनी ही कामे रेंगाळली असल्याची तक्रार स्थायी समितीत केली होती.
सलीम अली सरोवराजवळ पक्षी निरीक्षणासाठी अनेक जण आवर्जून येतात. थोडा विरंगुळा, निसर्गात थोडासा वेळ घालवता यावा, अशी जागा म्हणून या सरोवराची ओळख आहे. तेथे ठेकेदाराला वेगवेगळी कामे देण्यात आली. ती रडत-रेंगाळत का असेना, पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, सरोवराच्या देखभाल दुरुस्ती व विकासासाठी बीओटी तत्त्वावर ठेकेदार नेमण्यासाठीची कारवाई केली जाणार आहे.
बीएससी पावडरसाठीही निविदा
राज्यातील सर्व नगरपालिका आणि महापालिकांमधील बीएससी पावडरची खरेदी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खरेदी करण्याचे आदेश आहेत. या एकाच एजन्सीकडून पावडरची खरेदी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यापेक्षा कमी दरात एखादा ठेकेदार बीएससी पावडर देणार असेल, तर निविदा काढून तशी प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष विकास जैन यांनी केली. दर करार निश्चित असतानाही ठेकेदार निवडण्याच्या नव्या सूचनेमुळे अधिकारी संभ्रमात आहेत.