प्रवरा नदीपात्रातील मालुंजे येथन वाळुचा बेकायदा उपसा होत असून काही कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी ५ वाजता वाळुचे डंपर महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना पकडून दिले. पण एकाच डंपरवर कारवाई करण्यात आली. वाळू उपसा करणाऱ्यांवर आता सुमारे १७ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वाळुचे पाच ते सहा डंपर महसल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोडून दिले असा आरोप गावकऱ्यांनी केला असला तरी तहसीलदार पुरे यांनी मात्र त्याचा इन्कार केला. महसूल खात्याच्या पथकावर घरापासुनच वाळू तस्करांनी नजर ठेवली होती. मोटारसायकलवर पाठलाग करून तसेच मोबाईलवरून माहिती दिल्याने डंपर पळविण्यात आले. त्यामुळे ते पकडता आले नाही. मात्र एक डंपर पकडण्यात आला, असा खुलासा तहसीलदार अनिल पुरे यांनी केला आहे.
मालुंजे येथे बेकायदा वाळू उपसा करण्यात आला. लिलाव झालेला नसताना सुमारे १६५ ब्रास वाळू उचलण्यात आली. त्याचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे १७ लाख रुपयांचा दंड दिनकर बडाख याला केला जाणार असल्याची माहिती पुरे यांनी दिली. लाखो रुपयांची वाळू चोरी होऊनही फौजदारी कारवाई करण्याची टाळाटाळ महसूल खात्याने केली आहे. आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय गावातील काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
मालुंजे येथन दररोज भरदिवसा २० डंपर वाळू उपसा करतात. गावातील काही वाळू तस्कर प्रत्येक डंपर चालकाकडून दोन हजार रुपयांप्रमाणे पैसे गोळा करतात. गेल्या अनेक वर्षांपासन मालुंजे हे वाळू तस्करीचे केंद्र बनले आहे. त्याला राजकीय आशिर्वाद आहे. वाळू उपसा होवूनही महसल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही दखल घेतली नव्हती. काल कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दूरध्वनी करून माहिती दिली. पुरे यांनी नायब तहसीलदार कुलथे यांना पाठविले. पण अवघा एक डंपर पकडण्यात आला. आता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. महसुलमंत्र्यांच्या नावाखाली तालुक्यात वाळू तस्करी सुरू झाली आहे. त्यामुळे कारवाई होत नसल्याचे पुढे आले आहे.