पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याचे पुनरूज्जीवन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी दि. ४  फेब्रुवारीला पारनेर येथे सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे निवृत्त अप्पर आयुक्त भास्करराव शेळके यांनी हा माहिती दिली.
शेळके म्हणाले, सन २००४ मध्ये कारखाना अवसायनात काढण्यात आल्यानंतर कारखान्यावर असलेल्या कर्जाचे सुमारे १२ कोटी रूपयांचे व्याज वाचले आहे. या कालावधीत भाडेकराराने कारखाना चालवण्यासाठी देण्यात आल्याने या भाडय़ापोटी आलेल्या रकमेतून कर्जाची परतफेडही करण्यात आली आहे. कारखाना अवसयानात काढण्यात आल्यानंतर दहा वर्षांंनी त्याचा परवाना आपोआप रदद होऊन कराखान्याचे अस्तित्व संपुष्टात येईल. अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर राज्य सहकारी बँक कारखान्याची मालमत्ता विकून कर्ज वसूल करून घेईल. तसे झाले तर शेतकऱ्यांच्या कामधेनूला मुकावे लागेल.
कारखाना आणखी दहा ते बारा वर्षे भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची मागणी पुढे आली आहे, मात्र सन २०१४ मध्ये कारखान्याचा परवानाच रदद होणार असल्याने कारखान्याच्या पुनरूज्जीवनाशिवाय पर्याय नसल्याचा दावा शेळके यांनी केला. यासंदर्भात साखर आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांची या निर्णयास मान्यता आवश्यक आहे.  त्यासाठी सभा बोलवण्यासंदर्भात अवसयकांकडे वारंवार मागणी करण्यात आली, मात्र अवसायक ही सभा घेण्यास चालढकल करीत आहे. त्यावर विचार करण्यासाठीच सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसंदर्भात तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भेट घेउन वस्तुस्थिती निदर्शनास आणून देणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. माजी आमदार दादा कळमकर यांनीही शेळके यांच्या भुमिकेस पाठिंबा दिला आहे.