औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडणुकीस इच्छुक असणाऱ्या काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता तशी जेमतेमच म्हणता येईल, अशी आहे. परंतु त्यांनी शपथपत्रात दिलेल्या संपत्तीचे आकडे मात्र कोटीच्या घरात आहेत.
शेवटच्या क्षणी उमेदवारीची माळ ‘लक्ष्मी’ दर्शनाने पदरी पाडून घेण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा असणारे सुभाष झांबड यांनी १९८३ मध्ये वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेतले, तर शिवसेनेचे किशनचंद तनवाणी नववीपर्यंत शिकले आहेत. वरिष्ठ सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या या दोघांची संपत्ती मात्र लक्षणीय आहे. झांबड कुटुंबीयांची शपथपत्रातील संपत्तीची बेरीज १२ कोटी ५८ लाखांपेक्षा अधिक, तर तनवाणी यांनी ८८ लाख ३९ हजार एवढी संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. तनवाणींच्या शपथपत्रात त्यांच्या विरोधात १० गुन्हे दाखल असून त्याची सुनावणी न्यायालयात सुरू असल्याचे म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत लक्ष्मीपुत्रांची चलती असते. जालना जिल्ह्य़ातील काँग्रेसचे नेते बाबुराव कुळकर्णी यांचे नाव आधी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंतांना न्याय मिळतो, अशी प्रतिक्रिया उमटते न उमटते तोच उमेदवार बदलला गेला. राज्यस्तरावर नक्की काय झाले, याची चर्चा काँग्रेसमध्ये अजूनही सुरू आहे. धनशक्तीचा विजय असो, असे म्हणत ‘जय हो’ म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी घ्यायचा तो संदेश घेतला. शुक्रवारी उमेदवारी अर्जाची जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी झाली. छाननीदरम्यान नामनिर्देशन पत्रावर सही न केल्याने व वयाचा उल्लेख न भरल्याने देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे इच्छुकांच्या यादीतील एक नाव कमी झाले.
जडजवाहिरींचे शौकिन!
झांबड यांच्या शपथपत्रातील संपत्तीच्या आकडेवारीची यादी एवढी लांबलचक आहे की, त्याची बेरीज करणे कॅलक्युलेटरशिवाय सामान्याला शक्यच नाही. शपथपत्रात झांबड यांनी ४ कोटी ४५ लाख ५० हजार अशी स्वमालकीची संपत्ती दर्शविली, तर पत्नीच्या नावे ३ कोटी २५ लाख ११ हजार ५०० रुपये संपत्ती आहे. वारशाने आलेल्या संपत्तीचाही शपथपत्रात उल्लेख आहे. जेवढी संपत्ती आहे, त्या मानाने कर्जही नमूद केले आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांना जडजवाहिरांचा चांगलाच शौक आहे. झांबड यांच्याकडे ७२७ ग्रॅम तर पत्नीकडे ५०० ग्रॅम सोने आहे. जवळ असणाऱ्या १३ किलो चांदीची किंमत ५ लाख ८५ हजार असल्याचे नमूद केले आहे. तनवाणी यांच्याकडे २८ तोळे सोने आहे, तर पत्नीकडे ८६ तोळे सोने आहे. साडेतीन किलो चांदी असल्याचेही शपथपत्रात नमूद आहे. त्यांनी स्वमालकीची ८८ लाख ३९ हजार २६० रुपयांची संपत्ती नमूद केली आहे, तर ५० लाख रुपये वारसा हक्काने संपत्ती मिळाल्याचेही शपथपत्रात नमूद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zambad millionaire tanawani also near millionaire
First published on: 03-08-2013 at 01:30 IST