रुपेरी पडद्यावर अजरामर होण्याचे भाग्य फार थोडय़ांच्या नशिबात असते. श्यामा ही अशी एक अभिनेत्री. ‘ये लो मैं हारी पिया’, ‘ऐ दिल मुझे बता दे’, ‘जा रे कारे बदरा’ यांसारखी गाणी आजही कधीही ऐकायला मिळाली, की मन हरखून जाते. ही अशी गाणी श्यामाच्या वाटय़ाला आली. त्यामुळे मूकपटापासून ते बोलपटापर्यंत आणि कृष्णधवल ते रंगीत चित्रपटापर्यंतच्या या सगळ्या प्रवासात श्यामा या अभिनेत्रीने सगळ्यांच्या मनात घर केले.

वयाच्या दहाव्या वर्षी, १९४५ मध्ये अवचितपणे पडद्यासमोर उभे राहण्याची संधी त्या वेळच्या खुर्शीदने घेतली नसती, तर पुढचा इतिहास निर्माण झाला नसता. शालेय वयात असताना, एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिथे उभ्या असलेल्या सगळ्या मुलींना ‘एक्स्ट्रॉ’चे काम करण्याबद्दल विचारले, तेव्हा सगळ्या जणींनी काढता पाय घेतला, पण खुर्शीदने हिंमत दाखवली. घरची परिस्थिती बेतास बात. घरात नऊ भावंडे. त्यामुळे त्या इवल्याशा कामाचे मिळालेले चाळीस रुपये ही खुर्शीद ऊर्फ श्यामासाठी मोठी कमाई होती. मग अशा छोटय़ा मोठय़ा भूमिका करण्यास सुरुवात झाली. तब्बल ऐंशी चित्रपटांतून सहायक कलाकार म्हणून श्यामा झळकली. पण तरीही तिला तिची ओळख मिळाली नव्हतीच. नशीब बदलले ते आय. एस. जोहर यांच्या ‘श्रीमतीजी’ या चित्रपटातून. मुख्य अभिनेत्रीच्या रूपात श्यामा झळकली आणि सगळे चित्रच पालटून गेले जणू! नंतरच्या ‘लहरे’ चित्रपटात नायक होता किशोरकुमार. पण बिमल रॉय यांच्यासारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाने श्यामामधील गुण हेरले आणि मग ती ‘मलिका’ झाली. त्यांच्या ‘माँ’ या चित्रपटात तिला नायिकेची भूमिका मिळाली आणि त्याच वर्षांत तिच्याकडे एकोणीस चित्रपट चालून आले. त्या काळात गुरुदत्त या नावाचा दबदबा होता. वेगळ्या मांडणीसाठी आणि कथाविषयांसाठी गुरुदत्त प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘आर पार’ या चित्रपटातून श्यामा दिसली आणि तिने समस्त रसिकांवर अक्षरश: मोहिनीच घातली. चित्रपटांच्या दुनियेत आजही ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या फली मिस्त्री या कॅमेरामनबरोबरचा विवाह ही त्या काळात स्वाभाविक म्हणावी अशी घटना. विवाह त्यांच्या कारर्कीदीच्या आड मात्र आला नाही आणि श्यामा भूमिका करीतच राहिली.

सुमारे साडेचार दशके भारतीय रुपेरी पडद्यावर आपली छबी झळकत ठेवणारी श्यामा व्यथित झाली याचे कारण जे. पी. दत्ता यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने काढलेले उद्गार. एखाद्या प्रसंगाची तयारी करताना श्यामा जेवढी उत्तम अभिनय करायची, मात्र प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी त्यातील जिवंतपणाच हरवतो, असे जेव्हा ते म्हणाले, तेव्हा चित्रपटसृष्टी बदलतेय, याची तिला खात्री पटली. काळ बदलतो, तशी आवडनिवडही बदलते. काळाचा नियमच तो. श्यामाच्याच वाटय़ाला तो आला असे नाही. पण तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर सार्वजनिक जीवनातूनही तिने निवृत्ती स्वीकारली. प्रेक्षकांच्या मनात आपले जे रूप साठवले गेले आहे, त्याला तडा जाऊ नये, असे तिला वाटले आणि ती अज्ञातवासात रवाना झाली. तरीही ‘आर पार’, ‘दिल दिया दर्द लिया’, ‘बरसात की रात’, ‘मिलन’, ‘तराना’ यांसारख्या तिच्या चित्रपटांच्या कारकीर्दीला मात्र सगळे जण सलामच करत राहिले.  आजकालच्या जमान्यात जे सतत समोर येत राहते, त्याचीच ओळख राहते, त्यामुळे पुसले जाण्याचा अवधी दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. श्यामाची आठवण आताच्या रसिकांना असण्याचे कारण नाही. पण म्हणून तिचे महत्त्व मात्र जराही कमी होत नाही. तिच्या निधनाने चित्रपटाच्या दुनियेतील एक हुन्नर काळाच्या पडद्याआड गेला आहे.