21 February 2019

News Flash

गुरचरण सिंग कालकट

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची गरज नाही

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची गरज नाही, त्यांना मीटरनुसार वीज द्यावी, कंत्राटी शेतीला उत्तेजन देतानाच खासगीकरणाला वाव द्यावा तरच शेतकऱ्यांना भवितव्य आहे, अशा क्रांतिकारी सूचना करणारे कृषीशास्त्रज्ञ व गुरचरण सिंग कालकट यांचे नुकतेच निधन झाले. कृषी अध्यापनाच्या क्षेत्रात वावरतानाच शेतकऱ्यांबरोबर जाऊन त्यांनी काम केलेले होते, त्यामुळे कृषी क्षेत्रातील सर्व प्रश्नांची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यावर त्यांनी उपायही सुचवले होते.  त्यांना कृषी क्षेत्रात जी दृष्टी होती ती अपवादात्मक व्यक्तींमध्ये सापडते. देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्य़ातील सिहोरा येथे त्यांचा जन्म झाला.  त्यांनी सध्या पाकिस्तानात असलेल्या लायलपूर येथील पंजाब कृषी विद्यापीठातून बीएस्सी पदवी घेतली. सोलान येथे पंजाब विद्यापीठातून कृषी क्षेत्रात स्नातकोत्तर पदवी घेऊन ते रॉकफेलर फेलोशिपवर अमेरिकेत गेले. तेथे ओहिओ स्टेट विद्यापीठातून त्यांनी कृषी प्राणिशास्त्रात पीएचडी केली. मेक्सिकन गव्हाच्या प्रजातीचे बियाणे भारतात आणून १९६०च्या मध्यावधीत हरितक्रांती घडवण्यात आली त्यात त्यांचाही सहभाग होता. नोबेल विजेते नॉर्मन बोरलॉग व डॉ. एम. एस स्वामिनाथन यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. पंजाबमधील कृषी संशोधनास वेगळी दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे माजी अध्यक्ष, पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त ही पदे त्यांनी भूषवली होती. इंदिरा गांधी यांच्या काळात ते देशाचे कृषी आयुक्त होते. शेतकऱ्यांचे कल्याण व भरभराट यासाठी ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत कार्यरत होते. पंजाब कृषी विद्यापीठ व प्रत्यक्ष शेतकरी यांच्यात त्यांनी सहकार्य घडवून आणले, त्यामुळे आधुनिक कृषी पद्धती शेतक ऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू शकल्या. पद्मश्री व पद्मभूषण या नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले. जागतिक बँकेतही त्यांनी दहा वष्रे कृषितज्ज्ञ म्हणून काम केले. खोल नलिका विहिरी व हातपंप हे नायजेरियात बसवले गेले ते त्यांच्याच कल्पनेतून. त्यामुळे तेथील शेतीच्या समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत झाली. जागतिक बँकेच्या श्रीलंका, नेपाळ व इंडोनेशिया देशांसाठीच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना सहकाराच्या माध्यमातून यंत्रे घेण्यास मदत करतानाच त्यांनी ट्रॅक्टरवरचे कर्ज कमी करण्यास सांगितले कारण पंजाबमध्ये १ लाख ट्रॅक्टरची गरज असताना प्रत्यक्षात साडेचार लाख ट्रॅक्टर आहेत ते अनावश्यक आहेत, असे त्यांचे मत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे दु:ख त्यांना अखेपर्यंत सलत होते.

First Published on January 29, 2018 3:11 am

Web Title: agricultural scientist gurcharan singh kalkat