12 August 2020

News Flash

अजित नरदे

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात सहकार चळवळीच्या हिणकसपणामुळे अस्वस्थ झालेल्या शेतकरी वर्गाचे अजित नरदे हे प्रतिनिधी होते.

अजित नरदे

शेतीमालाला रास्त भाव मिळावा अशी मागणी करणारे चाकणचे कांदा आंदोलन आणि पाठोपाठ झालेल्या ऊस आंदोलनामुळे शेतकरी संघटनेची भूमिका १९८० च्या दशकाच्या प्रारंभी महाराष्ट्रभर गेली. शेतीप्रश्नावरच्या या नव्या मांडणीने शेतकऱ्यांमध्ये जसे चैतन्य पसरले, तसेच चळवळ्या तरुणांनाही आकृष्ट केले. त्यामुळेच अभ्यासू तरुणांची एक फळीच संघटनेचे प्रणेते शरद जोशींबरोबर वावरू लागली. अजित नरदे हे त्यांपैकी एक. नंतर संघटना विस्कटली, अनेक जण सोडून गेले, काहींनी वेगळा मार्ग पत्करला; पण आंदोलने, मोर्चाबरोबरच शेतीप्रश्नांचा अभ्यासही अशा दुहेरी आघाडीवर तब्बल चार दशके नरदे अखंड कार्यरत राहिले. गेल्या आठवडय़ात कोल्हापूरमधील जयसिंगपुरात ते पायी चालत असताना, अचानक वेगवान दुचाकीने त्यांना धडक दिली. त्या अपघातात जखमी झालेल्या नरदेंचे उपचारांदरम्यान मंगळवारी निधन झाले.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात सहकार चळवळीच्या हिणकसपणामुळे अस्वस्थ झालेल्या शेतकरी वर्गाचे अजित नरदे हे प्रतिनिधी होते. तेव्हा दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडकित्त्यात अडकल्यासारखी झालेली स्थिती पाहता, नवी मांडणी घेऊन आलेल्या शेतकरी संघटनेचा आधार इथल्या शेतकऱ्यांना वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे राष्ट्र सेवा दल आणि प्रजा समाजवादी पक्ष अशा समाजवादी संघटनांत सुरुवातीच्या काळात काम केलेल्या नरदेंनी खुल्या आर्थिक धोरणाचे समर्थन करणाऱ्या शेतकरी संघटनेत जाणे, यात अस्वाभाविक असे काही नाही. १९८० साली शरद जोशींनी त्यांच्याकडे संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. सांगलीच्या जयपाल फराटेंसोबत या भागात नरदेंनी शेतकरी संघटना रुजवली. १९९० च्या दशकात राजू शेट्टींसारखे तेव्हाचे उत्साही तरुण हेरून नरदेंनी संघटना वाढवली. प्रसंगी संघटनेची जबाबदारी या तरुणांकडे सोपवून अभ्यासाच्या आघाडीवर कार्यरत राहणेही त्यांनी पसंत केले. ‘साखर डायरी’ संपादित करणाऱ्या नरदेंनी ‘शेतकरी संघटना : राजकीय भूमिका’ ही पुस्तिका १९९४ साली लिहून संघटनेच्या राजकीय प्रवासाबद्दलची स्पष्टता कार्यकर्त्यांना दिलीच; पण पुढील काळात उदारीकरण, डंकेल प्रस्ताव आदी मुद्दय़ांबरोबरच २००० सालानंतर बदललेल्या स्थितीत शेतकऱ्यांची आंदोलने असोत किंवा वाण संशोधन, कीडनाशकांचा वापर, बीटी बियाणांचे समर्थन अशा अनेक मुद्दय़ांवर ते अभ्यासू मांडणी करत. सेंद्रिय/नैसर्गिक शेतीच्या नावाखाली चालणाऱ्या शेतकी बुवाबाजीवर ते परखड टीका करत. जैविक शेतीला विरोध नाही, पण शेती यशस्वी आणि फायद्याची करायची तर पर्यायांचा विचार करायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच पेरण्याचे आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य यांसाठी ते शेवटपर्यंत आग्रही राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2020 12:02 am

Web Title: ajit narade profile abn 97
Next Stories
1 मेरी हिगिन्स क्लार्क
2 अरविंद कृष्ण
3 तुषार कांजिलाल
Just Now!
X