News Flash

अल्विन प्लाटिंगा

श्रद्धेला जीवनात स्थान नाही हे काही विद्वानांचे मत त्यांनी १९५० मध्ये खोडून काढले.

अल्विन प्लाटिंगा

तत्त्वज्ञानात देवाच्या अस्तित्वाला महत्त्व असते किंबहुना ते तत्त्वज्ञानाच्या आड येत नाही, असे प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञ अल्विन प्लाटिंगा यांना यंदाचा टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी ‘गॉड अँड अदर माइंड्स’ या १९६७ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात देवाच्या अस्तित्वाविषयी मते मांडली होती. अमेरिकेतील दानशूर गुंतवणूकदार व तत्त्वज्ञ जॉन टेम्पलटन यांच्या नावे १.४ दशलक्ष डॉलर्सचा हा पुरस्कार १९७२ पासून दिला जातो. हा पुरस्कार मिळाल्याने प्लाटिंगा हे आता दलाई लामा, मदर तेरेसा, आर्च बिशप डेस्मंड टूटू, बिली ग्रॅहॅम यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. लोकांचा देवावर असलेला विश्वास सार्थ ठरवण्यात त्यांनी सैद्धांतिक मांडणी केली. विशेषकरून ख्रिश्चन तत्त्वज्ञ म्हणून ते मान्यता पावले आहेत. काविन कॉलेज व नॉत्र डेम विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत. त्यांनी तत्त्वज्ञान विषयाची आध्यात्मिक मांडणी नव्या पद्धतीने केली असून त्यांच्या मते तत्त्वज्ञानाबाबतची कुठलीही मांडणी ही धार्मिक विश्वासाच्या विरोधात असण्याचे कारण नाही किंबहुना तत्त्वज्ञानातील कुठल्याही प्रश्नांची उत्तरे शोधताना देवाचे अस्तित्व मान्य केल्यास ते अधिक सोपे जाते असे त्यांचे म्हणणे आहे. श्रद्धेला जीवनात स्थान नाही हे काही विद्वानांचे मत त्यांनी १९५० मध्ये खोडून काढले. गेल्या अनेक वर्षांच्या तत्त्वज्ञान अभ्यासात त्यांनी धर्म व तत्त्वज्ञान यांच्या नात्याकडे लोक कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात यावर क्रांतिकारी मते मांडली. त्यांनी विविध परंपरांतील धार्मिक तत्त्वज्ञ व देवावर श्रद्धा असणाऱ्या ख्रिश्चन तत्त्वज्ञांच्या तीन पिढय़ा घडवण्याचे काम केले. त्याबाबत त्यांनी तत्त्वज्ञान व देवावरील श्रद्धा याबाबत १९८४ मध्ये एक शोधनिबंध लिहिला होता. २०११ मध्ये त्यांनी एका मुलाखतीत धार्मिक श्रद्धा व विज्ञान यांच्यातील एकमेकांस पूरक नात्याची गुंतागुंत उलगडण्याचे काम केले. गॉड अँड अदर माइंड्स- अ स्टडी ऑफ द रॅशनल जस्टिफिकेशन (१९६७) या त्यांच्या पुस्तकाने ख्रिश्चन तत्त्वज्ञान व आस्तिकतावाद यांना नवे वळण दिले. धर्माचे तत्त्वज्ञान, मेटॅफिजिक्स अशा अनेक विषयांवर त्यांनी इ. स. २००० पासून तात्त्विक मांडणी केली. विसाव्या शतकातील अमेरिकेचे एक महान तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. आस्तिक विरुद्ध नास्तिक या तार्किक वादात त्यांनी वैश्विक मान्यताप्राप्त तात्त्विक मांडणी केली. वॉरंट ट्रायॉलॉजीत त्यांनी देवावर विश्वास ठेवण्याचे केलेले समर्थन व त्यामागील तार्किकता ही अजोड आहे, असे टेम्पलटन फाऊंडेशनने म्हटले आहे. माझ्या कार्यामुळे जर तत्त्वज्ञान क्षेत्रात काही क्रांतिकारी बदल गेल्या काही दशकांत घडून आले असतील तर त्याचे मला समाधानच आहे असे ते सांगतात. प्लाटिंगा यांचे बालपण मिशिगन येथे गेले. त्यांना प्रॉटेस्टंट पंथातील डच काविनिझमचा वारसा लाभला होता. देव या संकल्पनेबाबत त्यांना आधीपासूनच प्रश्न पडत होते व ते त्यांनी तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. हार्वर्ड विद्यापीठात दोन सत्रे पूर्ण केल्यानंतर ते काविन कॉलेजमध्ये आले व नंतर येल विद्यापीठातून डॉक्टरेट केली. हार्वर्ड, ऑक्सफर्ड, कॅलिफोर्निया विद्यापीठांत त्यांनी काही काळ अध्यापन केले. त्यांना यापूर्वी क्युपर पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी एकूण १३ पुस्तके लिहिली, त्यात नॉलेज अँड ख्रिश्चन बिलीफ व वॉरंटेड ख्रिश्चन बिलीफ या पुस्तकांचा समावेश आहे. प्लाटिंगा यांनी धार्मिक श्रद्धांबाबत केलेली मांडणी ही तत्त्वज्ञानाच्या अनेक पैलूंच्या माध्यमातून वेध घेणारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:02 am

Web Title: alvin plantinga templeton prize winner
Next Stories
1 आर. विद्यासागर राव
2 राजीव राय भटनागर
3 जोनाथन डेमी
Just Now!
X