News Flash

आंद्रे ब्राहिक

माणसाला जन्मजातच आकाशातील ग्रहताऱ्यांबाबत कुतूहल असतं.

माणसाला जन्मजातच आकाशातील ग्रहताऱ्यांबाबत कुतूहल असतं. आंद्रे ब्राहिक यांनाही ते लहानपणापासूनच होतं. शनी या आपल्या सौरमालेतील एकाच ग्रहाला कडी आहेत असे आधी वाटत होते, पण त्यातूनच प्रेरणा घेऊन ब्राहिक यांनी अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ विल्यम हबार्ड यांच्यासमवेत नेपच्यूनभोवतीही अशी कडी आहेत याचा शोध लावला होता.
त्यांचा जन्म पॅरिसचा. त्या वेळी नाझींच्या ताब्यात हे शहर होते. फ्रान्समधील खगोलवैज्ञानिक आयव्हरी शाटझमन यांचा आदर्श ठेवून त्यांनी खगोल संशोधनातील पुढची देदीप्यमान वाटचाल केली. दक्षिण फ्रान्समध्ये त्यांचे वंशज खाणकाम करीत असत. त्यांना सिलिकॉसिस रोग झाला, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी मात्र खाणकाम सोडून रेल्वे उद्योगात नोकरी धरली होती. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कुटुंबात आंद्रे यांच्या रूपाने एक हिरा जन्माला आला. सौरमाला या विषयात ते तज्ज्ञ होते, त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे खगोलभौतिकीतील एका उमद्या व्यक्तिमत्त्वास आपण मुकलो आहोत. अतिशय भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व, आपुलकीचा स्वभाव, चेहऱ्यावर झळकणारी विद्वत्ता, विज्ञानातील गुजगोष्टी मुलांना समजतील इतक्या सोप्या भाषेत सांगण्याची हातोटी ही त्यांची वैशिष्टय़े.
अवकाशातील अवघड गुपिते सोपी करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. ‘वर्ल्ड्स एल्सव्हेअर-आर वुई अलोन’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक, त्याशिवाय त्यांनी खगोलविज्ञानावर अनेक पुस्तके लिहून ज्ञानाचा खजिना सामान्यांसाठी रिता केला. १९८४ मध्ये त्यांनी नेपच्यूनच्या कडय़ांचा शोध लावला, ती एकात गुंफलेली कडी लिबर्टी, इक्व्ॉलिटी व फ्रॅटर्निटी या नावाने ओळखली जातात. ब्राहिक हे फ्रेंच पर्यायी ऊर्जा व अणुऊर्जा आयोगाचे सदस्य होते. त्याशिवाय त्यांनी पॅरिस विद्यापीठात अध्यापनाचे कामही केले होते. कॅसिनी हायगेन या शनीच्या संशोधनासाठी सोडलेल्या अवकाशयानाच्या प्रतिमाचित्रण यंत्रणानिर्मितीच्या चमूत त्यांचा सहभाग होता. व्हॉयेजर व कॅसिनी यानांनी पाठवलेल्या माहितीचा अर्थ लावून त्यांनी सौरमालेविषयी मानवाच्या ज्ञानात मोलाची भर टाकली होती. विशेष म्हणजे त्यांचे नाव ३४८८ क्रमांकाच्या एका लघुग्रहाला देण्यात आले होते. खगोलविज्ञानाच्या प्रसारात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्या कार्ल सॅगान यांच्या नावाचे पदक त्यांना २००१ मध्ये मिळाले होते. अवकाशाची गुपितं त्यांनी त्यांच्या संशोधनातून उकलली. अखेपर्यंत त्यांच्यात संशोधकाला लागणारे कुतूहल कायम होते. नासा व युरोपीय स्पेस एजन्सीच्या अनेक मोहिमांत त्यांनी सहकार्य केले होते. विज्ञानातील गोष्टींनी लहान मुलांचे डोळेही कुतूहलाने चमकून उठतात, असे ते म्हणायचे. आंद्रे ब्राहिक आता देहाने आपल्यात नसले तरी ते उरले आहेत एका लघुग्रहाच्या रूपात, निरभ्र रात्रीच्या ग्रहगोलात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2016 3:01 am

Web Title: andre brahic
Next Stories
1 डॉ. यू. आर. राव
2 न्या. धनंजय चंद्रचूड
3 बाबा हरदेव सिंह
Just Now!
X